काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी छत्तीसगडमधील शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले असून कर्जमाफीसाठीचे पैसे विजय मल्ल्या, नीरव मोदी, अनिल अंबानी अशा लोकांकडून वसूल केले जातील, असे त्यांनी म्हटले आहे.

छत्तीसगडधील विधानसभा निवडणुकीतील शेवटच्या टप्प्यात राहुल गांधी यांनी शनिवारी प्रचारसभा घेतली. या सभेत त्यांनी नोटाबंदी, कर्ज बुडवणारे उद्योजक यांच्यावरुन मोदी सरकारला फटकारले. मोदी यांनी नोटाबंदीची घोषणा करुन सर्वसामान्यांच्या अडचणी वाढवल्या. पण श्रीमंत उद्योजकांना त्यांनी दिलासा दिला. मोदींनी श्रीमंत उद्योजकांचे ३. ५ लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले.पण गरीब शेतकऱ्यांचे कर्ज त्यांनी माफ केले नाही, असे त्यांनी सांगितले.

छत्तीसगडमध्ये काँग्रेसची सत्ता येताच १० दिवसांच्या आत आम्ही शेतकऱ्यांचे कर्ज माफ करु, असे राहुल गांधींनी जाहीर केले. कर्जमाफीसाठी पैसे कुठून आणणार, याचे उत्तरही त्यांनी दिले. ‘मोदीजी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सी अशा लोकांकडून आम्ही पैसे वसूल करु आणि गरीब शेतकऱ्यांचे कर्जमाफ करु, असे त्यांनी सांगितले.

देशातील गरीब जनतेने चोरी केली नव्हती. मोदींनी नोटाबंदीच्या माध्यमातून पैशांची चोरी केली. नोटाबंदीद्वारे त्यांनी गरीबांना बँकेसमोर रांगेत उभे केले. तुम्ही सूटबूटवाल्या लोकांना बँकेसमोर रांगेत पाहिले का?, असा सवाल त्यांनी विचारला. राफेल करारावर मोदींनी १५ मिनिटे माझ्याशी खुली चर्चा करावी,असे आव्हानही त्यांनी दिले. राफेल कराराद्वारे मोदींनी अनिल अंबानी यांच्या कंपनीला ३० हजार कोटी रुपये दिले, असा आरोप त्यांनी केला.

आम्ही कधीही खोटे आश्वासन देत नाही. तुम्ही गेल्या १५ वर्षांमधील माझे भाषण पाहा. मी कधीही खोटी आश्वासनं दिली नाहीत. मी जे सांगितले ते करुन दाखवले, असा पुनरुच्चार त्यांनी केला.