जवाहरलाल नेहरु नव्हे तर जनतेमुळे एक चहावाला देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान होऊ शकला, असे स्पष्ट करतानाच जर तुमच्या मनात लोकशाहीबाबत इतकी आस्था आहे तर फक्त एकदाच पाच वर्षांसाठी गांधी कुटुंबाबाहेरील व्यक्तीला काँग्रेस अध्यक्षपदी संधी द्यावी, असे आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेस खासदार शशी थरुर यांना दिले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी छत्तीसगडमधील अंबिकापूर आणि मध्य प्रदेशमध्ये सभा घेतली. या सभेत त्यांनी शशी थरुर यांना प्रत्युत्तर दिले. जवाहरलाल नेहरुंमुळेच एक चहावाला देशाचा पंतप्रधान होऊ शकला, असे थरुर यांनी म्हटले होते. याचा समाचार मोदींनी घेतला. मोदी म्हणाले, नेहरु नव्हे तर जनतेमुळे मी देशाचा पंतप्रधान होऊ शकलो. मात्र याचे श्रेयही ते जनतेला द्यायला तयार नाही. यातून त्यांची लोकशाहीविरोधी भूमिका दिसून येते. याचे श्रेयही ते नेहरुंना देत आहेत, असा टोला त्यांनी लगावला. काही लोक माझ्याकडे हिशोब मागत आहेत. पण आधी तुम्ही गेल्या चार पिढ्यांचा हिशोब द्यावा, असे त्यांनी सुनावले.

गरीब व्यक्ती आजारी पडल्यावर त्यांच्याकडे सरकारशिवाय कोणताही पर्याय नसतो. गावात रस्ता नसेल तर त्यांच्यापर्यंत विकास कसा पोहोचणार. गाव, शहर, आपले- परके, जातपात असा भेदभाव न करता विकास केला पाहिजे. भाजपा हा एकमेव असा पक्ष आहे जो कोणताही भेदभाव न करता सर्वांचा विकास करतो, असा दावा त्यांनी केला. मोदींनी निर्मल बाबांवरुन काँग्रेसला चिमटा काढला. टीव्हीवर एक बाबा येतात, जे सांगतात जिलेबी खाल्ल्याने देवाची कृपा होईल. असे बाबा आता काँग्रेसवाले झाले आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.