छत्तीसगडचे राज्यपाल बलरामजीदास टंडन यांचे वयाच्या ९० व्या वर्षी मंगळवारी निधन झाले. त्यांना रायपूर वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. सोमवारी ते १५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या कार्यक्रमाच्या रंगीत तालमीत सहभागी झाले होते.

मंगळवारी सकाळी अचानक त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना रूग्णालयात नेण्यात आले होते. ९० वर्षीय टंडन यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. परंतु, त्यांच्याकडून उपचाराला प्रतिसाद मिळू शकला नाही आणि त्यांची प्रकृती आणखी खालावली.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, त्यांना जीवरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले होते. त्यांच्यावर उपचारासाठी वैद्यकीय पथकाची नियुक्ती करण्यात आली होती. आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

बलरामजी दास टंडन हे वर्ष १९५१ ते १९५७ पर्यंत पंजाब जनसंघाचे सचिव आणि १९९५ ते ९७ पर्यंत पंजाब भाजपाचे अध्यक्ष होते. १९६९-७० मध्ये पंजाबमध्ये अकाली दल-जनसंघाच्या आघाडीच्या सरकारमध्ये ते उपमुख्यमंत्री होते. तर १९७७-७९ आणि १९९७-२००२ मध्ये पंजाबच्या प्रकाशसिंह बादल सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्री होते. त्यांनी १८ जुलै २०१४ मध्ये राज्यपाल पदाची शपथ घेतली होती. केंद्रीय गृहमंत्रालयाने मार्च २०१८ मध्ये जारी केलेल्या राजपत्रानुसार राज्यपालांच्या वेतनात वाढ करण्यात आली होती. ते १ जानेवारी २०१६ पासून दिले जाणार होते. परंतु, टंडन यांनी वाढीव वेतन घेण्यास नकार दिला होता. त्यावेळी त्यांच्या निर्णयाचे मोठे कौतुक झाले होते.