छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांसोबत झालेल्या चकमकीत दोन नक्षलवादी ठार झाले आहेत. कांकेर जिल्ह्यात गुरुवारी रात्री ही चकमक पार पडली अशी माहिती नक्षलवादी विरोधी अभियानाचे महानिरीक्षक पी सुंदरराज यांनी दिली आहे. ताडोकी पोलीस स्टेशन अंतर्गत असणाऱ्या मालेपारा आणि मुरनार गावांच्या दरम्यान असणाऱ्या जंगलात ही चकमक पार पडली.

राज्य पोलीस महासंचालक (नक्षलवादी विरोधी अभियान) गिरधारी नायक यांनी दिलेल्या माहितीनुसार, नक्षलवादी विरोधी मोहिम राबवली जात असताना गस्त पथकावर नक्षलवाद्यांनी गोळीबार केला. यानंतर चकमकीला सुरुवात झाली. या चकमकीत दोन नक्षलवादी ठार झाले. चकमक बराच वेळ सुरु होती. यानंतर काही वेळाने नक्षलवादी घटनास्थळावरुन फरार झाले.

ठार झालेल्या दोन्ही नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले असून त्यांची ओळख पटवली जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. चकमक पार पडलेल्या ठिकाणावरुन दोन एसएलआर रायफल्स, एक ३०३० रायफल आणि शस्त्रसाठा जप्त करण्यात आला असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.