कोब्रा कमांडो दलाचे जवान राकेश्वर सिंह मनहास शनिवारी छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये झालेल्या नक्षलवादी हल्ल्यापासून बेपत्ता आहेत. बेपत्ता कमांडो नक्षलवाद्यांच्या ताब्यात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे आहे. अशात बेपत्ता कमांडो आपल्या ताब्यात आहे, असा दावा नक्षलवाद्यांनी केल्याचं समजतंय.

‘फ्री प्रेस जर्नल’च्या वृत्तानुसार, नक्षलवाद्यांनी सोमवारी दोन स्थानिक पत्रकारांना फोन करुन बेपत्ता कमांडो आपल्या ताब्यात असल्याचा दावा केला आहे. बिजापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष गणेश मिश्रा आणि पत्रकार राजा राठोड यांना फोन करुन नक्षलवाद्यांनी बेपत्ता जवान आपल्या ताब्यात असल्याचा दावा केला. याबाबत बिजापूरचे पोलिस अधीक्षक कामलोचन कश्यप यांनी सुरूवातीला माध्यमांशी बोलताना नक्षलवाद्यांकडून फोन आल्याच्या वृत्ताचं खंडन केलं, पण नंतर पत्रकारांना फोन आल्याचं सांगितल्यावर त्यांनी, “हो जवान नक्षलवाद्यांच्या ताब्यात असू शकतो कारण सुरक्षा दलाने घटनेनंतर जवळच्या पाच-सहा किलोमीटरच्या परीसरात त्याचा बराच शोध घेतला होता पण त्यांना यश आलं नाही” अशी प्रतिक्रिया दिली.

Video :’माझ्या वडिलांना सोडा’, नक्षलवाद्यांनी अपहरण केलेल्या कोब्रा कमांडोच्या निरागस मुलीची आर्त हाक

“जवानाला शोधण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत, आम्ही फोन कॉल्सचे लोकेशन शोधण्याचा प्रयत्न करीत आहोत”, अशी माहिती एसपी कश्यप यांनी दिली आहे.

दरम्यान, छत्तीसगड जिल्ह्यात नक्षलवाद्यांविरोधातील मोहीम चुकीच्या पद्धतीने व अकार्यक्षमपणे आखली होती, असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. नक्षलवाद विरोधी मोहिमेवेळी सुरक्षा दलांचे २२ जवान मारले गेले, त्यावर गांधी यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, “नक्षलवाद विरोधी मोहिमेची चुकीची व अकार्यक्षम आखणी यामुळे आमचे २२ जवान बळी गेले आहेत. आमचे जवान जर अशा पद्धतीने बळी जाणार असतील तर प्रत्येक भारतीय जवानाला चिलखती संरक्षण दिले पाहिजे. आमचे सुरक्षा जवान स्वेच्छेने हुतात्मा होत नाहीत व ते तोफेच्या तोंडी बळी देण्यासाठी नाहीत. एकविसाव्या शतकात कुणाही जवानाला चिलखती संरक्षणाशिवाय शत्रूशी लढण्यास पाठवणे चुकीचे आहे. प्रत्येक सैनिकाला चिलखती संरक्षणाची सुविधा दिली पाहिजे”. तर, देशात नक्षलवादाविरोधातील लढाई अधिक तीव्र करण्यात येईल असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नक्षलवादी हल्ल्यात २२ सुरक्षा जवान हुतात्मा झाल्यानंतर तेथील भेटीत सांगितले.

आणखी वाचा- ‘नक्षलवाद्यांविरोधातील मोहिमेची आखणीच चुकीची होती’

शनिवारच्या या हल्ल्यात एकूण २२ जवान यात हुतात्मा झाले त्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे आठ जण असून कोब्रा कमांडो दलाचे सात कमांडो तर जिल्हा राखीव दलाचे ८ , विशेष कृती दलाचे ६ जण यांचा समावेश आहे. एक जवान बेपत्ता आहे.