छत्तीसगडमधील नेते कवासी लखमा यांनी विद्यार्थ्यांना राजकारणातील शिकवण देताना एक अजब सल्ला दिला आहे. जर तुम्हाला राजकारणात येऊन मोठा नेता व्हायचं असेल तर जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षकाची कॉलर पकडा असं कवासी लखमा यांनी विद्यार्थ्यांना सांगितलं आहे. कवासी लखमा उत्पादन शुल्क व उद्योग मंत्री आहेत. सुकमा जिल्ह्यात शिक्षक दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे धक्कादायक वक्तव्य केलं.

कवासी लखमा यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत कवासी लखमा विद्यार्थ्यांसोबत शाळेबाहेर प्रांगणात बसलेले दिसत आहेत. यावेळी त्यांनी एक जुनी घटना विद्यार्थ्यांसोबत शेअर केली. एका विद्यार्थ्याने यशस्वी राजकारणी होण्याचा कानमंत्र विचारला. यावर त्यांनी सांगितलं की, “मोठा नेता होण्यासाठी जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षकांची कॉलर पकडा,”.

दरम्यान कवासी लखमा यांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचा दावा केला आहे. “मी विद्यार्थ्यांना मोठा नेता व्हायचं असेल तर लोकांची सेवा करा, त्यांच्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन भांडा असा सल्ला दिला,” असा दावा त्यांनी केला आहे.

कवासी लखमा काँग्रेसचे पाच वेळा आमदार राहिले आहेत. याआधी लोकसभा निवडणुकीआधी केलेल्या वक्तव्यामुळे ते चर्चेत आले होते. जर माझ्या विरोधातील उमेदवाराला मत दिलंत तर तुम्हाला वीजेचा धक्का बसेल असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. “तुम्हाला ब्रिजेश ठाकूर यांना मत देत पहिलं बटण दाबायचं आहे. जर दुसऱ्या क्रमांकाचं बटण दाबलं तर वीजेचा धक्का बसेल. तिसरं दाबलंत तरीही तेच होईल. आम्ही त्याप्रमाणे बटणात बदल केले आहेत,” असं वक्तव्य त्यांनी केलं होतं.

२०१३ मध्ये नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात छत्तीसगड काँग्रेसच्या अनेक नेत्यांचा मृत्यू झाला होता. यामध्ये फक्त कवासी लखमा सुखरुप बचावले होते. यानंतर त्यांच्यावर हल्ल्यात सहभागी असल्याचा संशय व्यक्त करत चौकशी करण्यात आली होती. पण नंतर पुराव्याअभावी एनआयएने त्यांची सुटका केली होती.