छत्तीसगडचे शालेय शिक्षणमंत्री प्रेमसाई एस टेकाम यांनी टीका करण्याची पातळी ओलांडत पंतप्रधान मोदींवर एक भयानक आरोप केला आहे. छत्तीसगड येथील कोरिया जिल्ह्यातील एका कार्यक्रमासाठी आलेल्या या मंत्रीमोहदयांनी माध्यमांशी बोलताना पंतप्रधान मोदींवर चक्क चोरी करायला लावत असल्याचा आरोप केला आहे.

शिक्षणमंत्री टेकम यांची एक बॅग अमरकंटक एक्स्प्रेसमधून चोरल्या गेली होती. बॅग चोरी झाल्यानंतर त्यांनी हे वादग्रस्त विधान केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, केंद्र सरकारचे शंभर दिवस पूर्ण झाल्यानंतर मोदीजी रेल्वेमध्ये चोरी करायला लावत आहेत, मंत्र्यांच्या बॅग चोरायला लावत आहेत, ही त्यांची उपलब्धी आहे. असाही त्यांनी यावेळी आरोप केला आहे.

रायपुरहून रेल्वेमार्गे मंगळवारी सायंकाळी पेंड्रा रोडकडे जात असताना, अमरकंटक एक्स्प्रेसमधून त्यांच्या बॅगेची चोरी झाली आहे. दुसरीकडे मंत्रीमोहदयांची बॅग पळवल्या गेल्याने रेल्वे प्रशासन आणि स्थानिक प्रशासन बॅग शोधण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. मात्र अद्याप बॅगचा शोध लागलेला नाही.

मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घटनेची माहिती मिळाल्यानंतर बॅगचा शोध सुरू झाला, परंतु बुधवारीही त्या पिशवीबद्दल कोणतीही माहिती मिळाली नाही. रेल्वेच्या प्रथम श्रेणीच्या डब्यातून बॅग चोरी झाल्याने रेल्वेच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.