छत्तीसगडमधील बस्तर या नक्षलग्रस्त भागातील प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच थेट शहरी नक्षलवादावर भाष्य केले आहे. शहरी नक्षलवादी हे एसी खोलीत बसतात, त्यांची मुलं परदेशात शिक्षण घेतात. पण ते रिमोट कंट्रोलद्वारे आदिवासी भागातील तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त करत आहेत आणि अशा शहरी नक्षलवाद्यांना काँग्रेस का पाठिंबा देत आहे, पत्रकाराची हत्या करणाऱ्या नक्षलवाद्यांना काँग्रेस नेते क्रांतिकारी म्हणतात, अशा शब्दात नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. भाजपा हा कोण्याच्या कृपादृष्टीवर चालणारा पक्ष नाही, देशातील सव्वाशे कोटी जनताच भाजपासाठी हायकमांड आहे, असे सांगत त्यांनी काँग्रेसला चिमटा काढला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी बस्तरमधील जगदलपूर येथे प्रचार सभा घेतली. या प्रचार सभेत त्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल करत शहरी नक्षलवादावरुन त्यांना फटकारले. मोदी म्हणाले, ज्या मुलांच्या हातात पेन- पेन्सिल असायला हवी अशा मुलांच्या हातात काही राक्षसी वृत्तीचे लोक शस्त्रं देतात. त्यांच्या आई- वडिलांचे स्वप्न उद्ध्वस्त करतात. जे शहरी नक्षलवादी आहेत, त्यांची मुले परदेशात शिक्षण घेतात, स्वत:देखील चांगले आयुष्य जगतात, एसी खोलीत बसतात. पण रिमोट कंट्रोलद्वारे ते आदिवासी तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त करत आहेत, अशी टीका त्यांनी केली. काँग्रेसनेही शहरी नक्षलावादावर उत्तर दिले पाहिजे. शहरी नक्षलवाद्यांवर कारवाई केल्यावर काँग्रेस त्यांच्या समर्थनासाठी मैदानात का उतरते?. अशा लोकांपासून रक्षण करण्यासाठी छत्तीसगडमध्ये पुन्हा कमळ बहरलाच पाहिजे, असे मोदींनी सांगितले. दूरदर्शनचा पत्रकार कॅमेरा घेऊन आला होता. या पत्रकाराची नक्षलींनी हत्या केली आणि अशा नक्षलींना काँग्रेस नेते क्रांतिकारी म्हणतात, ही कोणती विचारधारा आहे, असा सवाल त्यांनी काँग्रेसला विचारला.

अटलबिहारी वाजपेयींचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी बस्तरमध्ये येतो. छत्तीसगडचा विकास फक्त भाजपामुळेच झाला. आगामी काळात लोक रोजगाराच्या शोधात छत्तीसगडमध्ये येतील, असा दावा त्यांनी केला. छत्तीसगडमध्ये भाजपाचा पराभव करणे अशक्य झाले त्यावेळी केंद्रातील काँग्रेस सरकारने १० वर्ष छत्तीसगडमधील विकास कामे रोखून ठेवली. पण भाजपा हा कोणा एका व्यक्तीच्या दबावाखाली काम करणारा पक्ष नाही. देशातील सव्वाशे कोटी जनताच आमच्यासाठी हायकमांड आहे, असेही त्यांनी नमूद केले. काँग्रेसने दलित, शोषित, वंचित घटकाला फक्त व्होट बँक समजले. काँग्रेस नेते आदिवासी समाजाची खिल्ली उडवण्यात धन्यता मानतात, अशी टीका त्यांनी केली.