रायपूर : छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांनी आपण आदिवासी असल्याचा केलेला दावा सरकारनियुक्त समितीने फेटाळल्यानंतर जोगी यांच्याविरुद्ध विलासपूर जिल्ह्य़ात एफआयआर नोंदविण्यात आला आहे.

अनुसूचित जमातीचे (एसटी) असल्याचा जोगी यांचा दावा सरकारच्या उच्चस्तरीय जात छाननी समितीने गेल्या आठवडय़ात फेटाळला आणि त्यांचे जात प्रमाणपत्र रद्द केले. त्यामुळे गैरमार्गाने जात प्रमाणपत्र मिळविल्याबद्दल जोगी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.आपण आदिवासी असल्याचा दावा यापूर्वीही जोगी यांनी अनेकदा केला होता, मात्र तेव्हाही हा दावा फेटाळण्यात आला होता. गुरुवारी रात्री जोगी यांच्याविरुद्ध सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात जिल्हा प्रशासनाच्या आदेशावरून गुन्हा नोंदविण्यात आल्याचे विलासपूरचे पोलीस अधीक्षक प्रशांत अग्रवाल यांनी सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने विलासपूरचे तहसीलदार टी. आर. भारद्वाज यांनी एफआयआर नोंदविला. छाननी समितीने जोगी यांचे जात प्रमाणपत्र २३ ऑगस्ट रोजीच्या आदेशान्वये रद्द केल्याचे जिल्हा प्रशासनाने निदर्शनास आणले आहे.

आमदार जोगी यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही, असे पोलीस अधीक्षकांनी सांगितले.