निवडणुका जाहीर झाल्यानंतर सत्तातुर राजकारण्यांची चलबिचल मतदारांसमोर उघडपणे व्यक्त होत असली, तरी छत्तीसगढमध्ये सध्या नागरिकांपेक्षा ज्योतिष आणि मंदिरांच्या पुजारी-पंडितांनाच नेत्यांचे सर्वाधिक दर्शन घडू लागले आहे. तिकिटोच्छुक उमेदवार, आजी-माजी नेते आपल्या नजीकच्या राजकीय भवितव्याचा धांडोळा घेण्यासाठी ज्योतिषद्वारांवर अधिक दिसत आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सुयोग्य मुहूर्त शोधण्यासाठी बहुतांश नेत्यांची रीघ लागली आहे. यातील काही जण कुठल्या पक्षामध्ये शिरकाव करावा, इथपासून कुठल्या ठिकाणी जिंकण्याची शक्यता आहे, इथपर्यंत भविष्योत्सुक झाले आहेत. त्यामुळे भविष्यकर्त्यांना निवडणूक हंगामामुळे अचानक सुगीचे दिवस आले आहेत. यातील बहुतांश भविष्योत्सुक उमेदवार भाजप आणि काँग्रेस पक्षाचे असल्याचे ज्योतिष आणि पुजाऱ्यांचे म्हणणे आहे.
निवडणूक जिंकण्यातील अनिश्चितता, ग्रहांमधील अडचणी यांच्यावर उपाय करण्यासाठी नेतमंडळी विविध यज्ञ, मंदिर आणि दग्र्याना भेटी देण्यात दंग असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.  निवडणूक काळात आघाडीचे राजकारण लोकप्रिय असल्याने कुणासोबत आघाडी योग्य, कुणाला मित्र बनविणे सोपे याची विचारणा ज्योतिषांकडे होत आहे. भाजप आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते घाऊकपणे कुंडली घेऊन माझ्याकडे येत असल्याचे दत्तात्रेय होसकरे यांनी सांगितले.