छत्तीसगड विधानसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील मतदान आता पाच दिवसांवर येऊन ठेपले, तरी प्रचाराचा ‘माहोल’ कुठेच दिसत नाही. उमेदवारांची प्रचार कार्यालये ओस पडलेली दिसतात. सामान्य लोकांमध्येही फारसा उत्साह नाही. आचारसंहितेच्या अतिरेकामुळे निवडणुकीचे वातावरण निर्माण होऊ शकले नाही, असे राजकीय नेत्यांचे मत आहे.
मुख्यमंत्री डॉ. रमणसिंह निवडणूक लढवत असल्यामुळे राजनांदगाव जिल्हय़ातील विधानसभेच्या सहा जागांकडे साऱ्या राज्याचे लक्ष लागले आहे. गेल्यावेळी भाजपला चार जागा मिळाल्या होत्या. यावेळी चित्र वेगळे असेल असे काँग्रेसचे नेते सांगतात, तर चार ऐवजी पाच जागी पक्षाला विजय मिळेल, असे भाजपच्या वर्तुळातून सांगितले जाते. हे दावे प्रतिदावे मोठय़ा तावात केले जात असले, तरी या जिल्हय़ात फिरताना कुठेही प्रचाराचा माहोल दिसत नाही. डॉ. रमणसिंगांच्या प्रचार कार्यालयाला भेट दिली, तर तिथेही बोटावर मोजण्याएवढेच कार्यकर्ते हजर होते. पक्षाचे शहर अध्यक्ष रमेश पटेल यांना विचारले असता त्यांनी सारे कार्यकर्ते बूथपातळीवर प्रचार करण्यात व्यस्त आहेत. कार्यालयात गर्दी करण्यापेक्षा बूथवर थांबा असेच निर्देश सर्वाना दिले आहेत. त्यामुळे गर्दी दिसत नाही असे ते म्हणाले.
येथे आलेल्या निवडणूक आयोगाच्या निरीक्षकांनी पक्षाच्या प्रचार यंत्रणेला जाणीवपूर्वक त्रास देणे सुरू केले आहे. अनेकांच्या घराची झडती घेतली जात आहे. फलक उतरवले जात आहेत. काँग्रेसने आता या निरीक्षकांच्या माध्यमातून भाजपला त्रास देणे सुरू केले आहे, असा आरोप पटेल यांनी केला. या अतिरेकाची आयोगाकडे तक्रार केली पण कुणीही त्याची दखल घेत नाही. कारण सारे काँग्रेसच्या इशाऱ्यावरून सुरू आहे असे ते म्हणाले. काँग्रेसचे नेते मात्र दिवाळी अजून संपलेली नाही. अनेक लोक बाहेरगावी गेले आहेत. येत्या एक-दोन दिवसात प्रचाराला वेग येईल, असे सांगतात. निवडणूक म्हटले की सर्वत्र प्रचाराचा जोर असतो. फलक, पोस्टर युद्ध दिसते. सर्वत्र भोंगे वाजत असतात. या भागात असे काहीही आढळून येत नाही.
ग्रामीण भागातसुद्धा असेच वातावरण आहे. सध्या धानकापणीचा हंगाम सुरू असल्याने शेतकरी शेतात व्यस्त असल्याचे चित्र या भागात फिरताना दिसते. प्रचाराचा माहोल उभा करण्यात माध्यमांची भूमिकासुद्धा महत्त्वाची असते. यावेळी निवडणूक आयोगाने पेड न्यूजवर बंधने आणल्याने माध्यमांमधूनसुद्धा निवडणुकीच्या बातम्या कमी दिसतात. काही वृत्तपत्रांनी ‘आम्ही पेडन्यूज प्रकाशित करीत नाही’ अशी जाहिरात रोज प्रकाशित करणे सुरू केले आहे. उमेदवारांचे मेळावे, नेत्यांच्या सभा यांनासुद्धा माध्यमात मर्यादित स्थान मिळत असल्याचे येथे दिसून आले. त्यामुळे माहोल निर्माण होऊ शकला नाही, असे जाणकार बोलून दाखवतात.
छत्तीसगडमध्ये भाजपच्या अनेक नेत्यांनी बंडखोरीचा पवित्रा घेतला आहे. या बंडखोर नेत्यांची वक्तव्येसुद्धा माहोल निर्माण करण्यात अपयशी ठरल्याचे चित्र येथे आहे. अशा थंड वातावरणात या भागात बुधवारपासून राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांच्या जाहीर सभा सुरू झाल्या आहेत. बुधवारी नितीन गडकरींनी सलग तीन सभा घेतल्या. सोनिया व राहुल गांधी येत्या दोन दिवसांत बस्तरमध्ये सभा घेणार आहेत. भाजपाध्यक्ष राजनाथसिंह यांच्याही सभा आहेत. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदीसुद्धा या टप्प्यातील प्रचारात सहभागी होत आहेत. या सभा माहोल निर्माण करण्यात यशस्वी होतात का, हे येत्या एक-दोन दिवसांत स्पष्ट होणार आहे.