छत्तीसगडमधील रायगड जिल्ह्य़ातील सारनगड विधानसभा मतदारसंघ महिलांचा बालेकिल्ला आहे. छत्तीसगडची स्थापना झाल्यापासून एकही पुरुष उमेदवार या मतदारसंघातून विजयी झालेला नाही.
या वेळीही भाजप, काँग्रेस आणि बहुजन समाज पक्षाने या ठिकाणहून महिला उमेदवार दिले आहेत. १३ वर्षांपूर्वी छत्तीसगड अस्तित्वात आल्यापासून २००३ मध्ये बसपाच्या कामडा झोल्हे विजयी झाल्या, तर अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघातून गेल्या वेळी पद्मा मनहर यांनी विजय मिळवला. या वेळी काँग्रेसने पुन्हा पद्मा यांनाच संधी दिली आहे, तर बसपाने कामडा यांना उमेदवारी दिली आहे. गेल्या वेळी त्यांचा पराभव झाला होता, तर भाजपनेही केराबाई मनहर या नव्या चेहऱ्याला संधी दिली आहे.
सारनगडमध्ये २ लाख २२ हजार ९६८ मतदार आहेत. दुसऱ्या टप्प्यात १९ नोव्हेंबरला या मतदारसंघात निवडणूक होत आहे. या मतदारसंघात महिलाच विजयी होण्याचा इतिहास आहे. १९५७ मध्ये इथून नहूदै चौहान विजयी झाल्या होत्या. तत्कालीन मध्य प्रदेश प्रांतातील त्या पहिल्या महिला दलित आमदार ठरल्या होत्या. राज घराण्यातील महिलाही या परिसरातून विजयी होत गेल्या. यात १९६९ मध्ये राणी ललिता देवी पुसौर मतदारसंघातून बिनविरोध निवडून आल्या होत्या. राजकुमारी रजनीगंधा राजगड येथून १९६७ मध्ये लोकसभेवर निवडून गेल्या होत्या.