छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असतानाच रायपूर येथील ३७ वर्षांचे जिल्हाधिकारी ओ पी चौधरी हे भाजपात प्रवेश करणार आहेत. भाजपातील वरिष्ठ नेते आणि चौधरी यांच्यात चर्चा झाली असून त्यांना कोणत्या मतदार संघातून उमेदवारी द्यायची हे देखील निश्चित झाले आहे.

ओ पी चौधरी हे २००५ च्या बॅचचे आयएएस अधिकारी असून ते शेतकरी कुटुंबातून येतात. चौधरी यांना उत्कृष्ट प्रशासकीय सेवेसाठी पंतप्रधानांनी सन्मानित केले आहे. दंतेवाडा येथे असताना त्यांनी शिक्षण क्षेत्रासाठी काम केले. रायपूर मध्येही त्यांच्या कामाची जनतेने स्तुती केली होती.

चौधरी हे अघरिया समाजातून येतात आणि या समाजातील तरुण पिढीसाठी ते आदर्श आहेत. प्रशासकीय कामकाजात छाप पाडल्यावर आता चौधरी यांनी राजकारणात प्रवेश करण्याची तयारी सुरू केली आहे.

चौधरी यांना आगामी विधानसभा निवडणुकीत छत्तीसगडच्या रायगढ येथून उमेदवारी दिली जाणार आहे. भाजपातील सूत्रांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. चौधरी हे छत्तीसगडमधील भाजपाचे युवा नेते असतील आणि ते राजकारणातील यूथ आयकॉन असतील, असे भाजपाने म्हटले आहे. पण चौधरी यांनी अद्याप याबाबत प्रतिक्रिया दिलेली नाही.  काँग्रेसने मात्र यावर प्रतिक्रिया दिली आहे. प्रशासकीय सेवेतील अधिकारी उघडपणे राजकारणात येण्याची भूमिका घेत आहे. त्यांनी राजकारणात यावे आम्ही त्यांचा पराभव करु, असे काँग्रेसने म्हटले आहे.