छत्तीसगडमधील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भुपेश बाघेल यांनी नक्षलवादी काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार असल्याचा दावा केला आहे. ‘मंगळवारी संध्याकाळी मला एका अज्ञात क्रमांकावरुन फोन आला होता. फोनवरील व्यक्तीने स्वतःची ओळख माओवादी नेता अशी करुन दिली होती. त्याने स्वतःचे नाव गणपथी असे सांगितले होते. गेल्या वेळी आम्ही भाजपाला पाठिंबा दिला होता. यावेळी काँग्रेसला पाठिंबा देऊ असे आश्वासन त्याने दिले’, असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केला.

छत्तीसगडमधील काँग्रेस नेते भुपेश बाघेल यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत नक्षलवादी नेत्याचा फोन आल्याचा गौप्यस्फोट केला. ‘मला मंगळवारी संध्याकाळी फोन आला होता. नक्षलवादी नेता गणपथी बोलतोय, असं त्या व्यक्तीने सांगितले. गेल्या विधानसभा निवडणुकीत आम्ही भाजपाला मदत केली होती. या निवडणुकीत आम्ही काँग्रेसला मदत करु इच्छितो. ३७ जागांवर आमचा प्रभाव आहे असे त्याने सांगितल्याचे बाघेल यांनी नमूद केले.

‘मला या प्रकारावर संशय आला. माओवादी नेता गणपथीच्या नावाने हा फेक कॉल असावा असं मला वाटले. मी त्या व्यक्तीला प्रतिप्रश्नही केला. यावर त्या व्यक्तीने मला सांगितले की, गणपथी नावाने तुम्हाला कधी फोन आला आहे का?, माझ्या नावाने कोणी दुसऱ्याने फोन केला तर त्याचा शिरच्छेद केला जाईल. पुढील आठवड्यात आपण प्रत्यक्षात भेटून निवडणुकीबाबत चर्चा करु असंही गणपथीने सांगितल्याचा दावा बाघेर यांनी केला.

मी या संदर्भात पोलीस महासंचालकांकडे तक्रार केली आहे. मला ज्या क्रमांकावरुन फोन आला तो क्रमांकही मी पोलिसांना दिला आहे, असे बाघेल यांनी म्हटले आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंह यांनी या वृत्तावर अधिक भाष्य करण्यास नकार दिला. पोलीस या घटनेचा तपास करत आहे. मी तुर्तास यावर अधिक भाष्य करु शकणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

कोण आहे गणपथी?
गणपर्थी उर्फ मुप्पला लक्ष्मण राव हा नक्षली नेता असून तो अनेक नक्षलवादी कारवायांप्रकरणी वाँटेड आहे. त्याच्यावर राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) १५ लाख रुपयांचे इनाम जाहिर केले आहे.