छत्तीसगडमधील कोरबा येथे मोलमजुरीचे काम काम करणाऱ्या एका महिलेला वीज वितरण मंडळाने तब्बल ७५ कोटी रुपयांचे बिल पाठवल्याचे समोर आले आहे. वीजबिलाची रक्कम बघून सुरुवातीला त्या महिलेला आश्चर्याचा धक्काच बसला होता. शेवटी प्रसारमाध्यमांमध्ये वृत्त झळकल्यानंतर वीज वितरण विभागाने बिल छपाई दरम्यान ही चुक झाली असावी असे सांगत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

कोरबा जिल्ह्यातील भैसमा गावात राहणाऱ्या सरिता यादव या मोलमजुरी करुन उदरनिर्वाह करतात. गावात त्याचे दोन खोल्यांचे छोटेसे घर आहे. या घरात दोन बल्ब आणि दोन पंखे आहेत. मात्र सरिता यांना या महिन्यात तब्बल ७५ कोटी रुपयांचे वीजबिल पाठवण्यात आले. वीजबिलाचा आकडा सरिता यांना धक्काच बसला. एवढे पैसे भरायचे कुठून असा प्रश्न त्यांच्या मनात आला. शेवटी हा प्रकार छत्तीसगड वीज वितरण मंडळाच्या अधिकाऱ्यांसमोर मांडण्यात आला. प्रसारमाध्यमांनी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधल्यावर त्यांनी याप्रकरणातील चूक मान्य केली. टाइप करताना ही चूक झाली असावी. आम्ही त्या महिलेचे बिल दुरुस्त करणार असून जेवढी वीज वापरली त्याचेच पैसे त्यांना द्यावे लागतील असे अधिकाऱ्यांनी सांगितले. आम्हाला त्या महिलेच्या बिलावरील ग्राहक क्रमांक दिल्यास आम्ही तातडीने बिल दुरुस्त करुन देतो असे त्या अधिकाऱ्यांनी नमूद करत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.