छत्तीसगडच्या रायगड जिल्ह्य़ातील कागदाच्या एका कारखान्यात विषारी वायू नाकातोंडात गेल्याने सात कामगार आजारी पडल्याचे पोलिसांनी सांगितले. या कामगारांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना रायपूरला हलविण्यात आले आहे.

बुधवारी सायंकाळी हे कामगार साफसफाई करीत असताना तेतला गावातील शक्ती पेपर मिलमध्ये हा प्रकार घडला, असे रायगडचे पोलीस अधीक्षक संतोष सिंह यांनी सांगितले. या घटनेबाबत कारखान्याच्या मालकाने प्रशासनाला कळविले नाही, रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी याबाबत पोलिसांना सावध केले.

देशात टाळेबंदी जाहीर केल्यापासून कारखाना बंद होता, विषारी वायुगळती निश्चित कशामुळे झाली त्याचा शोध घेण्यासाठी न्यायवैद्यक तज्ज्ञांचे पथक घटनास्थळी रवाना करण्यात आले आहे. या प्रकरणी लवकरच गुन्हा नोंदविण्यात येणार असल्याचे सिंह यांनी सांगितले.