छत्तीसगडमध्ये दोन अल्पवयीन मुलींना एका खोलीत डांबून ठेवत त्यांच्यावर तब्बल १५ दिवस नऊ नराधमांनी अमानूष अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेवर छत्तीसगडमध्ये संताप व्यक्त होत असून पोलिसांनी नऊ पैकी सात जणांना अटक केली आहे.

कोरिया जिल्ह्यातील १७ आणि १५ वर्षांच्या दोन मुलींची मंगळवारी मध्य प्रदेशमधील बिजुरी रेल्वे स्थानक परिसरातून सुटका करण्यात आली. सुटकेनंतर या दोघींनी पोलिसांना दिलेली माहिती धक्कादायक होती. ‘कोरिया जिल्ह्यातील अभिजीत पाल उर्फ पिंकू (२०) याचे यातील एका मुलीशी प्रेमसंबंध होते. ४ मार्च रोजी त्याने मुलीला भेटायला बोलावले होते. अभिजीतला भेटायला जाताना तिच्यासोबत मैत्रीणही होती. अभिजीतने त्या दोघींना खोंगापनी येथील गावात नेले. अभिजीतने त्यांना एका घरात डांबून ठेवले. यानंतर अभिजीत व त्याच्या आठ मित्रांनी दोघींवर बलात्कार केला. तब्बल १५ दिवस त्यांना या यातनांचा सामना करावा लागला.

दुसरीकडे पीडित मुलीच्या पालकांनी मुली बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. खबऱ्यांमार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी मंगळवारी बिजूरी रेल्वे स्थानकातून पीडित मुलींची सुटका केली. यादरम्यान पोलिसांनी अभिजीत व त्याच्या सहा मित्रांना अटक केली. तर उर्वरित दोन आरोपी पळून गेले.

अश्रफ अली (२६), मनोज कुमार (२८), हेमराज पनिका (२०), अविनाश (२८), जितेंद्रकुमार राय (२६), राकेश कुमार नवैत (२३) आणि मुख्य आरोपी अभिजीत, अशी या अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. अपहरण, डांबून ठेवणे, बलात्कार आणि पॉस्को अॅक्ट अंतर्गत या सर्वांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.