सक्तवसुली संचालनलयाकडून (ईडी) आपला मुलगा कार्ती याच्यावर बेछूट आरोप केले जात असल्याचा दावा माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केला. ते मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी आपल्या मुलाचा बचाव करताना म्हटले की, ‘ईडी’च्या कालच्या प्रसिद्धीपत्रकात कार्ती याच्यावर कोणत्या कलमाखाली आरोप लावण्यात आले आहेत, हे नमूदच केले नव्हते. दोन कंपन्यांच्या व्यवहारांचा नियंत्रक आणि त्याचा लाभधारक कार्तीच होता, हा ‘ईडी’चा आरोप अतिरंजित व हास्यास्पद आहे. या प्रकरणात कार्तीचा सहभाग आढळला, याचा नेमका अर्थ काय घ्यायचा. यावरून एकच सिद्ध होते की, ईडी फक्त बेछूट आरोप करून कार्तीला यामध्ये खेचत आहे, असे चिदंबरम यांनी सांगितले.

‘ईडी’कडून काही दिवसांपूर्वी ४५ कोटी रूपयांच्या व्यवहारात परकीय चलन व्यवस्थापन कायद्याचे (एफईएमए) उल्लंघन झाल्याप्रकरणी कार्ती चिदंबरम आणि त्यांच्याशी संबंध असलेल्या कथित कंपनीला कारणे दाखवा नोटीस पाठविण्यात आली होती. चेन्नईस्थित मेसर्स वसान हेल्थ केअर प्रायव्हेट लिमिटेडलाही २,२६२ कोटींच्या व्यवहाराप्रकरणी अशीच नोटीस पाठविण्यात आली होती. मात्र, या व्यवहाराची न्यायालयाकडून तपासणी करण्यात आल्यानंतर ४५ कोटीच्या रकमेचे व्यवहार संशयास्पद असल्याचे आढळून आले होते. त्यामुळे याप्रकरणी मेसर्स अॅडव्हान्टेज स्ट्रॅटेजिक कन्सल्टिंग प्रायव्हेट लिमिटेड आणि कार्ती चिदंबरम यांना नोटीस पाठविण्यात आली होती. मात्र, कार्ती चिदंबरम यांनी यापूर्वीच आपण या कंपनीचे समभागधारक किंवा संचालक नसल्याचे स्पष्ट केले होते, अशी माहिती चिदंबरम यांनी दिली. दरम्यान, कार्ती यांना पाठविण्यात आलेल्या नोटीसला योग्य प्रत्युत्तर देण्यात येईल, असेही चिदंबरम यांनी काल सांगितले होते.