देशाचे माजी अर्थमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी. चिदंबरम यांना सीबीआयकडून अटक झाल्यानंतर काँग्रेस नेत्यांकडून सातत्याने सरकारवर टीका करण्यात येत आहे. आता तर काही नेत्यांनी सुप्रीम कोर्ट, दिल्ली हायकोर्ट आणि माध्यमांच्या भुमिकेवरही प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधीज्ञ कपिल सिब्बल यांनी सुचकपणे कोर्टांच्या भुमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना ज्या प्रकारे निर्णय दिले जात आहेत त्यावर चिंता व्यक्त केली आहे.
चिदंबरम यांचा अटकपूर्व जामीन नाकारणाऱ्या दिल्ली हायकोर्टाच्या न्यायाधीशांबाबत सिब्बल म्हणाले, न्यायाधिशांनी २५ जानेवारी रोजीच याबाबतचा निर्णय सुरक्षित ठेवला होता. त्यानंतर सात महिन्यांनंतर निवृत्तीसाठी दोन दिवस शिल्लक असताना त्यावर निर्णय देऊन टाकला. न्यायाधिशांच्या निर्णयाच्या टायमिंगवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. ते म्हणाले, न्यायाधिशांनी दुपारी ३.२५ आपला निर्णय दिला. त्यानंतर आम्ही अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल केली तर ती देखील संध्याकाळी ४ वाजता फेटाळण्यात आली, कारण आम्हाला सुप्रीम कोर्टातही जाता येऊ नये. ज्या प्रकारे कोर्टाचे निकाल दिले जात आहेत ती चिंताजनक बाब असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
Kapil Sibal: It’s a matter of great concern to us as members of legal fraternity, also it should be a matter of concern as citizens. All we wanted was a hearing,the presiding judge chose instead to say that I am sending the file to CJI. Isn’t a citizen entitled to be heard? pic.twitter.com/mzQzyZbRTe
— ANI (@ANI) August 22, 2019
याप्रकरणी सुप्रीम कोर्टात झालेल्या घडामोडींवरही सिब्बलांनी सवाल उपस्थित केले. ते म्हणाले, आरोपीला अधिकार असतो की तो वरिष्ठ कोर्टात अपिल करु शकतो. मात्र, सुप्रीम कोर्टातही आमचा हा अधिकार डावलण्यात आला. आम्हाला सुरुवातीला सांगण्यात आले की, आमच्या याचिकेवर सरन्यायाधीश निर्णय देतील. मात्र, सुप्रीम कोर्टाच्या केसेसच्या नोंदवहीनुसार सरन्यायाधीश एका खंडपीठातील कामात व्यस्त होते. अशा स्थितीत नियमानुसार, दुसऱ्या सर्वात वरिष्ठ न्यायाधीशांनी यावर सुनावणी घेणे क्रमपात्र असते. मात्र, आम्हाला सांगितले गेले की सरन्यायाधीश संध्याकाळी ४ वाजता तुमच्या याचिकेवर सुनावणी करतील. मात्र, यावेळी सुनावणीसाठी वेळ नसतो. यावरुन सिब्बल यांनी सुचकपणे म्हटले की, सुप्रीम कोर्टाने जाणीवपूर्वक चिदंबरम यांच्या याचिकेवर त्वरीत सुनावणी केली नाही. त्यामुळे सुनावणीच झाली नाही तसेच त्यानंतर दोन दिवसांनंतर याचिका सुनावणीसाठी यादीत येत असेल आणि दरम्यानच्या काळात जर अटक झाली तर अटकपूर्व जामीनासाठी याचिका दाखल करण्यास अर्थ काय उरतो.
दरम्यान, सिब्बल यांच्यासोबत काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि सुप्रीम कोर्टातील बडे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी माध्यमांतील वृत्तांवर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, माध्यमं ज्याप्रकारे चिदंबरम यांना पळून गेल्याचे सांगत होते, ते चुकीचे होते. चिदंबरम कुठेही गेले नव्हते त्यांनी काँग्रेसच्या कार्यालयात येऊन पत्रकार परिषद घेतली. त्यानंतरही माध्यमांनी ते पळून गेल्याचे विधान केले हे क्लेशकारक आहे.
हा केवळ चिदंबरम यांचा विषय नाही व्यवस्थेचा आहे – सिब्बल
चिदंबरम यांच्या अटकेपर्यंतच्या नाट्यावर भाष्य करताना कपिल सिब्बल म्हणाले, ही मोठी गंभीर बाब आहे. हा केवळ चिदंबरम यांचा विषय नाही तर व्यवस्थेचा विषय आहे. कायद्याप्रमाणे काम व्हायला हवे, याबाबत शंका नाही मात्र, ज्याप्रकारे कायदा व्यवस्थेची मोडतोड केली जात आहे, ते चिंताजनक आहे. भविष्यात सरकारविरोधी असणाऱ्या प्रत्येक क्षेत्रातील लोकांवर अशा कारवाया होतील. आज राजकीय पक्ष निशाण्यावर आहेत उद्या माध्यमांनाही निशाणा बनवला जाईल.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 22, 2019 12:19 pm