काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचा मुलगा कार्तीने स्पेनमध्ये टेनिस क्लब, यूकेमध्ये कॉटेज तसेच भारतात आणि परदेशात मोठया प्रमाणावर मालमत्ता खरेदी केली आहे. ही मालमत्ता खरेदी करण्यासाठी पैसा कुठून आला? पैशांचा स्त्रोत काय आहे ते जाणून घेण्यासाठी ईडीला चिदंबरम यांची चौकशी करायची आहे. INX मीडिया प्रकरणात कार्तीने लाच स्वीकारतील त्यातून त्याने ही सर्व मालमत्ता खरेदी केली असे ऑक्टोंबर २०१८ मध्ये ईडीने आपल्या आदेशात म्हटले आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

INX मीडिया आर्थिक अफरातफर प्रकरण आणि एअरसेल-मॅक्सिस २ जी स्कॅम प्रकरणात पी. चिदंबरम मुलासह सहआरोपी आहेत. सीबीआयसह ईडीने या दोन्ही प्रकरणांची चौकशी केली आहे. स्पेन बार्सिलोनमधील टेनिस क्लब आणि जमिनीची किंमत अंदाजे १५ कोटी रुपये आहे. ईडीने चेन्नईतील इंडियन ओव्हरसीज बँकेतील फिक्स डिपॉझीटमधील कार्ती यांचे ९.२३ कोटी रुपये तसेच डीसीबी बँकेतील एएससीपीएलची ९० लाखांची एफडी जप्त केली.

एएससीपीएल ही कार्ती यांच्याशी संबंधित कंपनी आहे. कार्ती यांच्याकडे नियंत्रण असलेल्या एएससीपीएलला पीटर मुखर्जी यांनी ३.९ कोटी रुपये दिल्याचा दावा ईडीने केला आहे. अन्य सहाय्यक कंपन्यांनी जे पैसे स्वीकारले ते एएससीपीएलकडे वळवण्यात आले. एएससीपीएलकडे आलेला सर्व पैसा गुंतवण्यात आला. एएससीपीएलने वासन हेल्थ केअरचे शेअर खरेदी केले. या शेअर्सचा काही भाग विकून ४१ कोटींचा नफा कमावण्यात आला असे ईडीच्या आदेशात म्हटले आहे.