आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम क्रिकेटमधील एक दिवसीय सामन्यासारखा नसतो, या शब्दांत केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी आपल्या टीकाकारांचा गुरुवारी समाचार घेतला. आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम पुढे नेण्यासाठी लवकरच काही नव्या घोषणा करण्यात येतील. त्यामध्ये थेट विदेशी गुंतवणूकीची मर्यादा आणि व्याप्ती आणखी वाढवणे तसेच वायू आणि कोळशाच्या दरांबाबत धोरणात्मक निर्णय़ याचा समावेश असेल, असे चिदंबरम म्हणाले.
आंतराष्ट्रीय बाजारात रुपयाची घसरण होत असल्यामुळे खूप चिंताक्रांत होण्याची गरज नाही. रुपयामध्ये पुन्हा सुधारणा होईल आणि नुकसानही भरून निघेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. चिदंबरम म्हणाले, पुढील काळात आर्थिक सुधारणाचा आणखी विस्तार करण्यात येईल. पुढील काही आठवड्यांमध्ये तसेच महिन्यांत यासंदर्भातील निर्णय जाहीर केले जातील. सुधारणांची गती वाढवल्यामुळे साहजिकच गुंतवणुकीचा वेगही वाढेल. आर्थिक विकासाचा वेग वाढवणे, हेच सध्या आमच्यापुढील उद्दिष्ट आहे.
संरक्षण तसेच कौशल्यविकास या क्षेत्रातील थेट विदेशी गुंतवणुकीची मर्यादा वाढवणे, वीजनिर्मिती प्रकल्पांना कोळशाचा पुरवठा आणि वायू, कोळशाची दरनिश्चिती यासंदर्भात प्राधान्याने निर्णय घेतले जातील, असेही चिदंबरम म्हणाले.