सुधारणा विधेयके संमत करण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम् यांनी भाजप नेत्यांशी गुरुवारी चर्चा केली. दीर्घकाळ प्रतीक्षेत असलेले विमा विधेयक तसेच प्रत्यक्ष कर संहिता विधेयक (डायरेक्ट टॅक्स कोड बिल) हिवाळी अधिवेशनात संमत व्हावे, म्हणून चिदंबरम् यांनी वेगवान हालचाली सुरू केल्या.
लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज तसेच राज्यसभेतील विरोधी पक्षनेते अरुण जेटली यांच्याशी चिदंबरम् यांनी विचारविनिमय केला. या विधेयकावर विचार करू, असे आश्वासन भाजपच्या नेत्यांनी दिले असल्याची माहिती चिदंबरम् यांनी दिली.
तुमच्या प्रस्तावावर पक्षपातळीवर चर्चा करून तुम्हाला कळवू, असे सांगत भाजपच्या नेत्यांनी चिदंबरम् यांना थेट आश्वासन देण्याचे टाळले. विमा क्षेत्रात परकीय गुंतवणूक वाढावी म्हणून विमा विधेयक मंजूर करण्यास सरकार उत्सुक आहे. प्रत्यक्ष कर संहितेवर सरकार आणि भाजप यांच्यात व्यापक एकमत आहे. परंतु काही मुद्दय़ांवर त्यांच्यात मतभेद असून या मुद्यांचे निराकरण झाल्याखेरीज सदर विधेयकास पाठिंबा द्यायचा नाही, असे भाजपने ठरविले आहे. डाव्या पक्षांनीही विमा विधेयक तसेच प्रत्यक्ष कर संहिता विधेयकास विरोध केला आहे.