अंधश्रद्धानिर्मूलन समितीचे प्रवर्तक नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे व प्रा. कलबुर्गी यांच्या हत्येनंतर वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या सनातन संस्थेवर बंदी घालण्यास माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदम्बरम यांनीच नकार दिला होता, असा गौप्यस्फोट गृह राज्यमंत्री किरण रिजीजू यांनी लोकसभेत केला. महाराष्ट्राच्या पुरोगाम्यांना घाबवरणाऱ्या सनातन संस्थेच्या फाइल्समध्ये काय दडले आहे याचा शोध घ्या, असे सुनावणाऱ्या खा. सुप्रिया सुळे यांना प्रत्युत्तर देताना रिजीजू यांनी हा खळबळजनक खुलासा केला.

रिजीजू म्हणाले की, सनातन संस्थेची फाईल तपासताना त्यावर तत्कालीन गृहमंत्री पी. चिदम्बरम यांनी अत्यंत स्पष्ट शब्दात टिप्पणी केली आहे. सनातन संस्थेवर बंदी घालण्याचे कोणतेही कारण (पुरावा) नाही. बंदी न घालण्याचा निर्णय हा तत्कालीन (संपुआ) सरकारचा होता. त्यामुळे आमच्यावर दोषारोप करू नका, असे रिजीजू म्हणाले. त्यावर सुळे खोचकपणे म्हणाल्या की, याचा अर्थ आमच्या सरकारने जे -जे केले ते योग्यच होते, असा होतो. काही चुकीचे घडत असेल तर ते रोखण्यास धाडस हवे असते. आमच्या सरकारने ते दाखविले होते. दाभोलकरांच्या हत्येनंतर त्यांच्या मारेकऱ्यांना शोधण्यासाठी आम्ही केंद्रीय गृह मंत्रालयापर्यंत पोहोचलो होते. पानसरे, दाभोलकर देशाचे खरे सुपुत्र होते. ज्यांना आम्ही केवळ असहिष्णुतेमुळे गमावले आहे.

ताजमहाल हिंदू मंदिर नव्हते!

गेले अनेक दिवस चाललेल्या वादाला पूर्णविराम देत मोदी सरकारने मंगळवारी संसदेत जाहीर केले की ताजमहाल पूर्वी हिंदू मंदिर नव्हते. सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा यांनी संसदेत एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, ताजमहालमध्ये पूर्वी कधी हिंदू देऊळ असल्याचे पुरावे सापडलेले नाहीत. ताजमहालच्या मालकीवरून चाललेल्या वादामुळे तेथील पर्यटनावर परिणाम झाला नसल्याचेही त्यांनी सांगितले. मुघलसम्राट शाहजहानने आग्रा येथे बांधलेला ताजमहाल म्हणजे पूर्वीचे शिवमंदिर होते. त्यामुळे त्याची मालकी हिंदूंकडे देऊन तेथे मुस्लिमांना तेथे प्रार्थना करण्यास बंदी घालावी, अशी याचिका गेल्या मार्च महिन्यात वकिलांच्या एका गटाने दाखल केली होती. आग्रा येथील न्यायालयाने ती रद्द ठरवली होती.

‘धर्मनिरपेक्षतेवरून खेळ नको’
धर्मनिरपेक्षता या शब्दावरून खेळ करायला नको, असा सल्ला काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी सरकारला दिला. देशात कोणत्या प्रकारची धर्मनिरपेक्षता प्रचलित आहे यावर चर्चा नाही आहे. देशात देहदंडाची असलेली शिक्षा म्हणजे लोकशाहीतील अपवाद आहे. त्यामुळे गुन्हेगारावर वचक बसत नाही. त्यामुळे ती शिक्षा बंद करावी असेही थरूर यांनी सूचविले.

दाऊद पाकिस्तानातच
दाऊद इब्राहिमचे पाकिस्तानात अड्डे असून तो त्याचा ठावठिकाणा सतत बदलत असतो, असे गृह राज्यमंत्री हरिभाई चौधरी यांनी सांगितले. ते म्हणाले, की पाकिस्तानला आम्ही नेहमी दाऊदविषयीचा तपशील देत असतो त्यात त्याचा पासपोर्ट पत्ते यांचा समावेश आहे, त्याला ताब्यात देण्याचीही मागणी केली आहे.