उच्च न्यायालयांच्या न्यायमूर्तीची तीन दिवसांची परिषद शुक्रवारपासून राजधानीत सुरू झाली. परिषदेने नेमका ख्रिस्तीधर्मीयांच्या पवित्र कालावधीचा मुहूर्त साधल्याबाबत नापसंती व्यक्त करून सर्वोच्च न्यायालयाच्या एका न्यायमूर्तीनी या परिषदेला वादाची किनार लावली.
देशातील २४ उच्च न्यायालयांच्या न्यायमूर्तीची परिषद गुड फ्रायडे ते ईस्टर संडे या ख्रिस्तीधर्मीयांसाठी पवित्र असलेल्या कालावधीत आयोजित करण्यावर आक्षेप घेणारे पत्र सर्वोच्च न्यायालयाचे न्या. कुरियन जोसेफ यांनी सरन्यायाधीश न्या. एच. एल. दत्तू यांना लिहिले आहे. या काळात आम्हाला धार्मिक समारंभांत किंवा कौटुंबिक संमेलनात भाग घ्यायचा असतो. अशी महत्त्वाची परिषद नेमक्या याच काळात घ्यायला नको होती, अशा शब्दांत न्या. जोसेफ यांनी त्यांची नाराजी व्यक्त केली. असे महत्त्वाचे कार्यक्रम दिवाळी, दसरा, होळी किंवा ईद अशा सणांच्या दरम्यान होत नाहीत, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.
‘व्यक्तीने संस्थेच्या हिताला प्राधान्य द्यावे की वैयक्तिक हिताला, असा प्रश्न मी तुम्हाला विचारू शकत नसल्याने स्वत:लाच विचारतो,’ असे सांगून न्या. दत्तू यांनी जोसेफ यांना प्रत्युत्तर दिले आहे. धार्मिक समारंभ किंवा कौटुंबिक संमेलने महत्त्वाची असतील, तर तुम्ही तुमच्या कुटुंबीयांना दिल्लीला बोलावून घेऊ शकता. परिषदेत सहभागी होणारे अनेक लोक कुटुंबांना मागे ठेवून दूरदुरून परिषदेसाठी आले असल्याचे त्यांनी जोसेफ यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
ख्रिश्चन लोक गुडफ्रायडेच्या दिवशी काम का करू शकत नाहीत, असा प्रश्न विचारणारे सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती के. टी. थॉमस यांच्यामुळे सरन्यायाधीशांना पाठबळ मिळाले आहे. ९८ टक्के ख्रिश्चन असलेल्या अमेरिकेत गुडफ्रायडे हा कार्यालयीन दिवस आहे, पण भारतात ‘सुटी संस्कृती’चे’ (हॉलिडे कल्चर) भूत आमच्या मानगुटीवर बसले आहे. माझा याला ठाम विरोध आहे, असे न्या. थॉमस यांनी म्हटले आहे.