सचिन पायलट यांनी बंड पुकारल्याने काही दिवसांपूर्वी अस्थिरतेच्या संकटाला सामोरं गेलेल्या अशोक गेहलोत सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. विश्वासदर्शक ठरावावर विधानसभेत आवाजी मतदान घेण्यात आलं. अशोक गेहलोत सरकारने विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विश्वासदर्शक ठराव मांडण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान विधानसभा अधिवेशन २१ ऑगस्टपर्यंत स्थगित करण्यात आलं आहे.

सचिन पायलट पुन्हा पक्षात परतल्याने गेहलोत सरकारवरील अस्थिरतेचं संकट टळलं होतं. विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर सचिन पायलट यांनी आपण चांगल्या बहुमताने विश्वासदर्शक ठराव जिंकलो असल्याची प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. विरोधकांनी अनेक प्रयत्न करुनही आमच्या सरकारच्या बाजूने निर्णय लागला असल्याचंही ते म्हणाले आहेत.

गांधी कुटुंबाची भेट घेटल्यानतंर सचिन पायलट यांचं बंड शमलं आणि अशोक गेहलोत यांच्यासमोरील संकटही टळलं. गुरुवारी दोन्ही नेत्यांनी एकमेकांची भेट घेत समेट झाल्याचंही दर्शवलं होतं. अशोक गेहलोत सरकारने विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विश्वासदर्शक ठराव मांडण्याचा निर्णय घेतला होता. दुसरीकडे, गेहलोत सरकारविरुद्ध अविश्वास ठराव आणण्याचं भाजपने जाहीर केलं होतं.

विश्वासदर्शक ठरावावरील चर्चेदरम्यान मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी काहीही झालं तरी आपण राज्य सरकार पडू देणार नाही असा निर्धार व्यक्त केला. यावेळी त्यांनी भाजपा सरकार पाडण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा आरोपही केला. “तुम्ही लोकांनी कर्नाटक, गुजरात आणि मध्य प्रदेशात जे झालं त्याची चिंता केली पाहिजे. देशभर लोकशाहीची खिल्ली उडविली जात आहे”.

आणखी वाचा- सचिन पायलट यांच्या काँग्रेस वापसीची इनसाइड स्टोरी

“अमित शाह नेहमी निवडून आलेली सरकारं कशी पाडावी याचीच स्वप्नं पाहत असतात. पण आम्ही हे सरकार पडू देणार नाही,” असंही अशोक गेहलोत यांनी यावेळी सांगितलं. “तुमचे पक्षप्रमुख किंवा हाय कमांड यांनी कितीही प्रयत्न केले तरी मी हे सरकार पडू देणार नाही,” असं यावेळी त्यांनी भाजपा नेत्यांना सुनावलं. भाजपा नेत्यांनी यावेळी काँग्रेस पक्षात अंतर्गत वाद असल्याचा मुद्दा उपस्थित केला. यावर सचिन पायलट यांनी विरोधकांनी आमच्यातील मतभेदांमध्ये न पडता विश्वासदर्शक ठरावावर लक्ष द्यावं असा सल्ला दिला.