मध्य प्रदेशमध्ये सुरू असलेले राजकीय नाट्य अधिकच रंगात आल्याचे दिसत आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर व काँग्रेसच्या २२ आमदारांनी राजीनामा दिल्याने राज्यातील कमलनाथ सरकार अडचणीत सापडले आहे. या पार्श्वभूमीवर आज काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी बंगळुरूमधील काँग्रेसच्या बंडखोर आमदारांची भेट घेण्याचा प्रयत्न केला असता, पोलिसांनी त्यांना मज्जाव करत ताब्यात घेतले. यावरून मुख्यमंत्री कमलनाथ यांनी भाजपासह शिवराजसिंह चौहान यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

मुख्यमंत्री कमलनाथ म्हणाले, सध्या भाजपाकडे बहुमतही नाही आणि शिवराजसिंह चौहान यांना भाजपाने आपला विधीमंडळ नेता म्हणून देखील निवडलेले नाही. भाजपाचे सरकार बनलेले नाही आणि कधी बनणार देखील नाही. मात्र मुख्यमंत्री बनण्यासाठी शिवराजसिंह यांची सुरू असलेली तडफड,अस्वस्थता संपूर्ण राज्य पाहत आहे. ते कशाप्रकारे सत्तेसाठी अस्वस्थ होत आहेत. त्यांना झोपही येत नाहीए, दिवसा देखील मुख्यमंत्रीपदाची स्वप्न पाहत आहेत. अधिकाऱ्यांना धमकावत आहेत, त्यांच्या परिस्थितीवर कीव येत आहे.

बंगळुरात भाजपाकडून बंदीस्त ठेवण्यात आलेल्या काँग्रेस आमदारांना भेटायला गेलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्यसभेचे उमेदवार दिग्विजय सिंह व काँग्रेसच्या मंत्री, आमदारांना भेटण्यापासून रोखले. त्यांच्यासोबत चुकीच्या पद्धतीने वर्तवणूक करण्यात आली. त्यांना जबरदस्ती ताब्यात घेणं हे हुकुमशाही व हिटलरशाही असल्याचही ते म्हणाले.

तसेच, संपूर्ण देश आज पाहात आहे की एका निवडून दिलेल्या सरकारला अस्थिर करण्यासाठी कशाप्रकारे भाजपाद्वारे लोकशाही मूल्यांची हत्या केली जात आहे. का आमदारांना भेटू दिले जात नाही, शेवटी भाजपाला कशाची भीती आहे? असा त्यांनी प्रश्न देखील त्यांनी केला आहे.

आणखी वाचा- MP political crisis: बंडखोर आमदारांना भेटायला गेलेल्या दिग्विजय सिंहांना अटक

भाजपाकडून राज्यात एक वाईट खेळ खेळला जात आहे. लोकशाही मूल्ये, संविधानिक मूल्ये व अधिकारांना दडपले जात आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या आमच्या नेत्यांची तातडीने सुटका करावी व बंदीस्त असलेल्या आमदारांना भेटण्यास परवानगी दिली जावी. अशी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी मागणी केली आहे.