पश्चिम बंगालमध्ये झालेल्या डॉक्टर आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सरकारकडून आता आंदोलक डॉक्टरांना एक नवा प्रस्ताव देण्यात आला आहे. ज्यानुसार मुख्यमंत्री ममता बॅनर्जी स्वतः प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयाच्या दोन प्रतिनिधींशी चर्चा करण्यास तयार आहेत.

पश्चिम बंगालमध्ये एकूण १४ वैद्यकीय महाविद्यालयं आहेत आणि मुख्यमंत्री बॅनर्जी या महाविद्यालयांच्या प्रत्येकी दोन प्रतिनिधींशी बैठक करणार आहेत. ही बैठक आज दुपारी ३ वाजता राज्य सचिवालयात होणार आहे. डॉक्टर प्रतिनिधींची ही बैठक आता माध्यमाशिवाय होणार आहे. केवळ ही चर्चा रेकॉर्ड केली जावी एवढीच मागणी डॉक्टरांच्यावतीने करण्यात आली आहे.

या अगोदर ममता यांनी शनिवारी तज्ज्ञ वैद्यकीय अधिका-यांना देखील बैठकीसाठी बोलावले होते. मात्र, डॉक्टरांनी या बैठकीस नकार दिला होता. यानंतर इंडियन मेडिकल असोशिएशनच्यावतीने या आंदोलनास पाठिंबा म्हणून सोमवारी सकाळी ६ वाजेपासून चोवीस तासांसाठी अत्यावश्यक नसलेल्या वैद्यकीय सेवा बंद ठेवण्याचा राष्ट्रव्यापीस्तरावर निर्णय घेण्यात आला. ज्यामध्ये बाह्यरूग्ण विभागाचा देखील समावेश आहे. मात्र आपत्कालीन सेवा, अपघात विभाग व अतिदक्षता विभागावर या निर्णयाचा कोणताही परिणाम होणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.