वायएसआर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष जगनमोहन रेड्डी यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्यानं येथील राजकीय वातावरण तापलं आहे. चंद्राबाबू नायडू यांना गोळ्या घातल्या पाहिजेत, असं वक्तव्य रेड्डी यांनी केलं आहे. कुर्नुल जिल्ह्यातील नंदयाल येथे जाहीर सभेत त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं. नायडूंनी निवडणुकांमध्ये जनतेला दिलेली आश्वासनं पाळली नाहीत. त्यांनी जनतेची फसवणूक केली आहे. अशा मुख्यमंत्र्यांना भरचौकात जनतेसमोरच गोळ्या घातल्या तर चुकीचं ठरणार नाही, असं रेड्डी म्हणाले. चंद्राबाबू हे मुख्यमंत्री नव्हेत तर मुख्यकंत्री (ठकसेन) आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.

आंध्र प्रदेशातील जनतेची नायडू यांनी फसवणूक केली आहे. प्रत्येक मुद्द्यावर दुटप्पी भूमिका मांडतात. त्यांनी दिलेली आश्वासनं पाळली नाहीत, असा आरोपही रेड्डी यांनी केला. जनतेची फसवणूक करणाऱ्या नायडू यांना गोळ्याच घातल्या पाहिजेत, असं वादग्रस्त वक्तव्य रेड्डी यांनी केलं. नायडूंनी राज्यातील शेतकरी, महिला, अल्पसंख्याक, बेरोजगार तरुणांना अनेक आश्वासनं दिली. पण ती पूर्ण केली नाहीत. नायडू हे कपटी आणि कलियुगातील राक्षस आहेत, अशी घणाघाती टीकाही रेड्डी यांनी केली.

नंदयाल विधानसभा मतदारसंघातील जागेसाठी २४ ऑगस्ट रोजी पोटनिवडणूक होत आहे. १२ मार्च रोजी भूमा नागी रेड्डी यांचं हृदयविकारानं निधन झाल्यानं ही जागा रिक्त झाली होती. पोटनिवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी रेड्डी यांनी जाहीर सभा घेतली. या सभेत त्यांनी नायडूंबद्दल हे वादग्रस्त विधान केलं आहे. ही पोटनिवडणूक म्हणजे न्याय आणि अन्याय यांच्यातील लढाई आहे. नायडूंच्या ‘कौरव सेने’चा पराभव करा, असं आवाहन रेड्डी यांनी मतदारांना केलं. दरम्यान, रेड्डी यांच्या वादग्रस्त वक्तव्यानं येथील राजकीय वातावरण तापलं आहे. मुख्यमंत्र्यांबद्दल वक्तव्य करणाऱ्या रेड्डींविरोधात तेलगू देसम पक्षाच्या नेत्यांनी पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारी दाखल केल्या आहेत. मुख्यमंत्र्यांना ठार मारण्याची धमकी देण्याची हिंमतच कशी झाली? असा संताप कुर्नुल येथील तेलगू देसम पक्षाचे नेते एस. राजशेखर यांनी व्यक्त केला. त्यांनीही रेड्डी यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. याशिवाय कृष्णा जिल्ह्यातील पक्षाचे अध्यक्ष डी. अविनाश यांनीही रेड्डी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. तसंच जिल्ह्यात ठिकठिकाणी रेड्डी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यांचे दहनही करून निषेध व्यक्त करण्यात आला.