03 March 2021

News Flash

मुख्यमंत्री नितीशकुमारच!

नरेंद्र मोदी यांचे संकेत; बिहारमध्ये ‘रालोआ’ला काठावरचे बहुमत

(संग्रहित छायाचित्र)

बिहारमध्ये ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ या सूत्रामुळेच राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (रालोआ) मोठे यश मिळाले. नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली बिहारला आत्मनिर्भर बनवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, अशी ग्वाही देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्रिपद नितीशकुमारांकडेच राहील, असे संकेत बुधवारी दिले.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या अटीतटीच्या लढतीत अखेर राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (रालोआ) काठावरचे बहुमत मिळवले. ‘रालोआ’चा विजय साजरा करण्यासाठी दिल्लीत भाजप मुख्यालयात बुधवारी ‘बिहार धन्यवाद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात मोदी यांनी भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

बिहारमध्ये ‘रालोआ’ आणि महाआघाडी यांच्यात बहुमतासाठी चुरस होती. करोनामुळे मतदान यंत्रांमध्ये वाढ करण्यात आल्याने मतमोजणीची प्रक्रिया लांबली आणि बुधवारी पहाटे पूर्ण निकाल जाहीर करण्यात आला. त्यात भाजप-जदयू यांच्या ‘रालोआ’ने १२५ जागा मिळवून २४३ जागांच्या विधानसभेत काठावरचे बहुमत मिळवले. महाआघाडीला ११० जागा मिळाल्या. मात्र ‘रालोआ’ला तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली कडवी झुंज देणारा राष्ट्रीय जनता दल (राजद) ७५ जागा मिळवून सर्वात मोठा पक्ष ठरला. त्यापाठोपाठ ७४ जागा मिळवून भाजपने दुसरे स्थान मिळवले.

या निवडणुकीत जदयूला मोठा फटका बसला. २०१५च्या निवडणुकीत ७१ जागा मिळवलेल्या जदयूला या निवडणुकीत केवळ ४३ जागा मिळाल्या. चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती (पान २ वर) (पान १ वरून) पक्षाला केवळ एकच जागा मिळाली. पण या पक्षाने किमान ३० जागांवर जदयूची विजयाची शक्यता धुळीस मिळवली.

नितीशकुमार यांच्याविरोधात प्रचार करण्यात ‘अपने भी शामिल थे और बेगाने भी’ अशी बोलकी प्रतिक्रिया जदयूचे प्रवक्ते के. सी. त्यागी यांनी दिली. मात्र नितीशकुमारच मुख्यमंत्री होतील, असा विश्वास त्यागी यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. बिहारचे भाजप प्रदेशाध्यक्ष संजय जयस्वाल यांनीही त्यास दुजोरा दिला होता.

या निवडणुकीत काँग्रेसचीही पीछेहाट झाली. गेल्या निवडणुकीत २७ जागा मिळालेल्या या पक्षाला या वेळी १९ जागाचजिंकता आल्या. या निवडणुकीत पाच जागा जिंकून बिहारमध्ये चंचुप्रवेश केलेल्या एमआयएमचा काँग्रेसला फटका बसला. माकप, भाकप आणि सीपीआयएमएल या डाव्या पक्षांनी सरस कामगिरी करत १६ जागांवर विजय मिळवला. विशेष म्हणजे २०१५च्या निवडणुकीत सीपीआयएमएल या पक्षाचे तीनच आमदार होते तर माकप आणि भाकपला खातेच उघडता आले नव्हते.

पक्षनिहाय जागा

राजद   : ७५

भाजप  : ७४

जदयू   : ४३

काँग्रेस  : १९

सीपीआयएमएल : १२

एमआयएम  : ०५

लोजप  : ०१

एकविसाव्या शतकात प्रामाणिकपणे विकासकामे करणाऱ्यांनाच देशसेवेची संधी मिळते, असा संदेश देशाच्या नागरिकांनी वारंवार दिला आहे. करोनास्थिती हाताळण्याच्या आमच्या धोरणावर बिहार निवडणूक निकालाने समर्थनाची मोहोर उमटवली आहे.   – नरेंद्र मोदी, पंतप्रधान

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2020 12:10 am

Web Title: chief minister nitish kumarnarendra modi hints abn 97
Next Stories
1 वैयक्तिक स्वातंत्र्याचे रक्षण झाले पाहिजे!
2 बिहारमध्ये ७ लाखांवर मतदारांकडून ‘नोटा’चा वापर
3 डिजिटल माध्यमांवर केंद्राचा अंकुश
Just Now!
X