तृणमुल काँग्रेस प्रमुख व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज (गुरूवार) गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. सुत्रांच्या माहितीनुसार या भेटीमागे काही विशेष कारणं आहेत, कोलकाताचे माजी पोलीस आयुक्त राजीव कुमार यांना वाचवण्याचा हा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे. कारण, कुमार हे सध्या सीबीआयच्या निशाण्यावर आहेत व ते ममता बॅनर्जी यांचे जवळचे मानले जातात. शिवाय टीएमसीच्या काही नेत्यांवरही सीबीआयच्या करावाईची टांगती तलावर आहे, जे की पश्चिम बंगालमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टीएमसीसाठी तोट्याचे आहे. याबरोबरच एनआरसीचा देखील मुद्दा ममतांनी उचलुन धरलेला आहे.

शारदा  चिट फंड गैरव्यवहाराप्रकरणी टीएमसीचे अनेक नेते आणि कोलकाताचे माजी पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्यावर सीबीआयची टांगती तलावार आहे व पश्चिम बंगालमध्ये एप्रिल-मे २०२१ दरम्यान विधानसभा निवडणुका होणार आहेत.

गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबरच्या भेटीबाबत ममता बॅनर्जींनी सांगितले की, मी प्रथमच गृहमंत्र्यांची भेट घेतली आहे. माझे जास्तवेळा दिल्लीत येणे होत नाही. काल मी पंतप्रधान मोदींची देखील भेट घेतली होती. तर आजच्या गृहमंत्र्यांबरोरच्या भेटीदरम्यान  विविध विषयांवर चर्चा झाली यावेळी आपण एनआरसीचा देखील मुद्दा मांडला. मी गृहमंत्र्यांना एक पत्र सोपवले आहे, एनआरसीच्या यादीतुन वगळण्यात आलेल्या १९ लाख लोकांबाबतही चर्चा केली. या लोकांमध्ये अनेक बंगाली, गोरखा आणि हिंदी भाषिकांचा देखील समावेश असल्याचे त्यांना सांगितले आहे.  तसेच, एनआरसीमुळे लोक घाबरलेले असल्याचे सांगत ममता बॅनर्जी यांनी सांगितले की, गृहमंत्री पश्चिम बंगालमधील एनआरसीबाबत  सध्यातरी काहीच बोलले नाही, त्यांनी केवळ आम्ही मांडलेले मुद्दे शांतपणे ऐकुण घेतले. मात्र मला अपेक्षा आहे की ते सकारात्मक प्रतिसाद देतील. गृहमंत्र्यांनी आम्हाला विश्वास दिला आहे की, ते या प्रकरणी गांभिर्याने विचार करतील, असेही त्यांनी यावेळी म्हटले.

 

दिल्लीच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. त्यांनी या भेटीला दोन सरकारमधील झालेली बैठक असले म्हटले व या भेटीत बहुतांश चर्चा ही राज्याच्या विकासाच्या मुद्यावर झाली असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. शिवाय मुख्यमंत्री ममता यांनी पंतप्रधान मोदींना पश्चिम बंगालमध्ये येण्याचेही निमंत्रण दिले आहे. ममता बॅनर्जी यांच्यात झालेल्या बदलाचे भाजपाकडून स्वागत होत आहे. या भेटीनंतरच त्यांनी आपण गृहमंत्री शाह यांची देखील भेट घेणार असल्याचे सांगितले होते. विशेष म्हणजे त्यांनी आपल्याकडे अर्थमंत्र्यांची भेट घेण्यास वेळ नसल्याचेही म्हटले होते. त्यानंतर आज गृहमंत्र्यांची त्यांनी आवर्जुन भेट घेतल्याचे दिसत आहे.