एच. डी. देवेगौडांचा खुलासा

काँग्रेससमोर आम्ही मुख्यमंत्रिपदाचा प्रस्ताव ठेवला होता, मात्र त्यांनी त्याचा स्वीकार केला नाही, असा खुलासा माजी पंतप्रधान आणि जनता दलाचे (धर्मनिरपेक्ष) नेते एच. डी. देवेगौडा यांनी केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाबाबत होत असलेल्या चर्चेला महत्त्व प्राप्त झाले आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये देवेगौडा यांनी वरील माहिती दिली. काँग्रेसने आपल्याशी संपर्क केला आणि आपण त्यांना संमती कळविली. या कठीण स्थितीत कुमारस्वामीच कारभार पाहू शकतात, असे काँग्रेसने म्हटले आहे, असेही ते म्हणाले.

आमच्या पराभावला माध्यमे जबाबदार आहेत, लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोणी आव्हान देऊ शकत नाही, असे चित्र माध्यमांनी आतापासून रंगविले, असे माजी पंतप्रधान म्हणाले. आपले वय झाले आहे. त्यामुळे २०१९ची निवडणूक आपण लढणार नाही, मात्र राजकारणातील आपले वय कोणीही निश्चित करणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.