शेतकऱ्यांना दिलेल्या वचनाची पूर्ती करत उत्तर प्रदेश सरकारने राज्यातील अडीच कोटी शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले आहे. १ लाख रुपयापर्यंत घेतलेले कर्ज माफ करण्यात येणार आहे. यासाठी ३६,००० कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. आज उत्तर प्रदेशच्या मंत्रिमंडळाची पहिली बैठक झाली. त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. भारतीय जनता पक्षामध्ये आमचे सरकार आल्यावर आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असे नेत्यांनी म्हटले होते. पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आम्ही कर्जमाफीचा निर्णय घेऊ असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी म्हटले होते. त्याप्रमाणेच भारतीय जनता पक्षाने ही कर्जमाफी दिली आहे. शेतकऱ्यांसाठी ३६,००० कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे.

ज्या प्रमाणे तुम्ही उत्तर प्रदेशात कर्जमाफीची घोषणा केली त्याप्रमाणे तुम्ही महाराष्ट्रात का करत नाही अशी मागणी महाराष्ट्रातील भाजपेतर सर्वच पक्षांनी केली होती. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी शिवसेनेनी भारतीय जनता पक्षाला वेळोवेळी आवाहन केले आहे तर विरोधी पक्षांनी या मुद्दावरुन कित्येकदा विधानसभेत गदारोळ केला. यामुळे १९ आमदारांना निलंबित करण्यात आले. तसेच महाराष्ट्रात संघर्ष यात्रेचे आयोजनही विरोधकांनी केले.

योगी आदित्यनाथ यांच्या या निर्णयामुळे उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. १ लाख रुपयांपर्यंत कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची संख्या उत्तर प्रदेशात अडीच कोटी आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांचे दलालांकडून शोषण होणार नाही याची विशेष काळजी घेतली जाईल असे सरकारने स्पष्ट केले.

याआधी सरकार बहुमतामध्ये येऊनही शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही म्हणत एका शेतकऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. योगी आदित्यनाथ यांच्या मठासमोरच एका शेतकऱ्याने स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला होता. त्याठिकाणी असलेल्या लोकांनी त्याला अडवले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते. आपल्यावर कर्जाचे ओझे आहे म्हणून आपण हे पाऊल उचलले असे त्याने म्हटले होते.