आसाममध्ये मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित करणार
लोकसभा निवडणुकीपासून विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर मते मागणाऱ्या भारतीय जनता पक्षाने दिल्ली व बिहारच्या निकालांचा धसका घेतला आहे. यापुढे विधानसभा निवडणुकीत मोदीनामाची महती सांगून मते न मागण्याची रणनीती भाजपने आखली आहे. नववर्षांत होणाऱ्या आसाम विधानसभा निवडणुकीत मोदींच्या नावावर मते मागण्यात येणार नाही. त्याऐवजी तेथे मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार भाजपकडून घोषित करण्यात येईल. यापूर्वी हरयाणा, महाराष्ट्र, झारखंड, दिल्ली व बिहारच्या निवडणुकीत भाजपने मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित न करता केवळ नरेंद्र मोदी यांच्याच नावावर मतांचा जोगवा मागितला होता.
हरयाणा, महाराष्ट्र व झारखंडमध्ये सत्ताविरोधी लाटेचा फायदा झाल्याने भाजपला सत्तास्थापनेची संधी मिळाली. बिहारच्या निकालावर एकदाही साधक-बाधक चर्चा भाजपमध्ये झाली नाही. भाजपचे अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय संघटनमंत्री रामलाल व वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत यापुढे मोदींच्या नावावर मते न मागण्याची रणनीती निश्चित करण्यात आली. दिल्ली व बिहारमध्ये मोदींच्या सभा झाल्यानंतरही पक्षाची सुमार कामगिरी झाली. त्यामुळे आता मोदींचा चेहरा पुढे करण्याऐवजी स्थानिक नेतृत्वाला निवडणुकीत प्राधान्य दिले जाईल, असा दावा पक्ष नेत्याने केला.

उत्तर प्रदेशसाठी शोध सुरू
नववर्षांत होणाऱ्या आसाम निवडणुकीत मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित करण्यात येणार आहे. याशिवाय पश्चिम बंगाल, तामिळनाडू व केरळमध्ये पंतप्रधानांच्या नावावर मते मागण्यात येणार नाहीत. जिथे विजयाची शक्यता आहे अशाच मतदारसंघात मोदी बंगालमध्ये सभा घेतील. तामिळनाडू व केरळमध्ये मोदी फारशा सभा घेण्यास उत्सुक नाहीत. भाजपमध्ये सर्वाधिक महत्त्व उत्तर प्रदेशला देण्यात येणार आहे. उत्तर प्रदेशमध्ये २०१७ साली होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी स्थानिक चेहऱ्याचा शोध सुरू झाला आहे. उत्तर प्रदेशचे महत्त्व लक्षात घेता येथे ओबीसी नेत्यास पुढे करण्यावर उच्चस्तरीय नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे.आल्याचे राजनाथ सिंह यांनी सांगितले.