चीनच्या आक्रमक कारवायांचा ‘अतिशय अनुरूप रीतीने’ सामना करण्यास भारताची सशस्त्र दले सक्षम आहेत, असे प्रतिपादन संरक्षण दल प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी गुरुवारी केले. पूर्व लडाखच्या काही भागांमधील सद्यस्थिती बदलण्याचे प्रयत्न चीन करत असल्याच्या पार्श्वभूमीवर रावत यांनी हे वक्तव्य केले आहे. पीटीआयने यासंबंधी वृत्त दिले आहे.

भारताच्या वचनबद्धतेच्या धोरणाला विश्वासार्ह लष्करी ताकद आणि क्षेत्रीय प्रभाव यांचा पाठिंबा नसेल, तर त्याचा अर्थ चीनच्या या क्षेत्रातील वर्चस्व मान्य केल्यासारखा होईल, असे यूएस- इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरमच्या संवादात्मक सत्रात बोलताना जनरल रावत म्हणाले. अतिशय गुंतागुंतीचे धोके आणि आण्विक ते पारंपरिक अशा व्यापक परिघातील संघर्षांची आव्हाने भारतापुढे आहेत, मात्र आमची सशस्त्रे दले ती पेलण्यास तयार आहेत, असे माजी लष्करप्रमुखांनी सांगितले.

आणखी वाचा- “फक्त लष्कर नाही तर देशालाही…,” भारत-चीन तणावावर लष्करप्रमुखांचं वक्तव्य

अलीकडच्या काळात चीनच्या काही आक्रमक कारवाया भारताच्या नजरेला पडत आहेत, मात्र त्यांना अतिशय अनुरूप रीतीने तोंड देण्यास आम्ही सक्षम आहोत, असे जनरल रावत यांनी या ऑनलाइन कार्यक्रमात सांगितले. चीनसोबत सीमेवर सुरू असलेल्या भांडणाचा फायदा घेण्याचा दु:साहस करण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केला, तर त्या देशाला प्रचंड नुकसान सोसावे लागेल, असा परखड इशाराही जनरल रावत यांनी पाकिस्तानला उद्देशून दिला.

आणखी वाचा- परिस्थितीचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला तर… बिपिन रावत यांचा पाकिस्तानला इशारा

लष्करप्रमुख दोन दिवसांच्या लडाख दौऱ्यावर
पँगाँग सरोवराच्या दक्षिण किनाऱ्यालगतची जैसे थे परिस्थिती बदलण्याबाबत चीनच्या ताज्या प्रयत्नांच्या ओभूमीवर, लडाखमधील सुरक्षाविषयक स्थितीचा र्सवकष आढावा घेण्यासाठी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी गुरुवारी लडाखचा दोन दिवसांचा दौरा सुरू केला.

या भागात सैन्य तैनातीवर देखरेख ठेवणारे उच्चपदस्थ लष्करी कमांडर जनरल नरवणे यांना सध्या उद्भवणाऱ्या परिस्थितीबाबत, या भागातील भारताच्या युद्धसज्जतेबाबत माहिती देतील, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले. चीनने पँगाँग सरोवराच्या दक्षिण किनाऱ्यावरील काही भागांवर ताबा मिळवण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्यानंतर पँगाँग लेक परिसरात तणाव वाढला होता. यानंतर भारताने या संवेदनशील भागात अतिरिक्त फौजा व शस्त्रे रवाना केली.