05 July 2020

News Flash

संरक्षण दल प्रमुखांच्या नियुक्तीचा प्रस्ताव कारगिल युद्धापासूनच

ब्रिटन, फ्रान्स, कॅनडा, श्रीलंकासह जगातील अनेक राष्ट्रांमध्ये हे पद अस्तित्वात आहे.

स्वातंत्र्यदिनी लालकिल्यावरून केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संरक्षण दलाच्या प्रमुख पदाची निर्मिती (चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ) करण्यात येत असल्याची घोषणा केली. लष्कर, नौदल आणि वायुदल हे सैन्यदलाचे तिन्ही विभाग या प्रमुखाच्या नेतृत्वाखाली काम करतील. पंतप्रधान किंवा सरकारला संरक्षण दलाच्या संदर्भात मार्गदर्शन आणि सल्ला देण्याचे काम या प्रमुखाचे असेल. अनेक देशांमध्ये हे पद अस्तित्वात आहे. आपल्याकडेही गेली २० वर्षे या पदाची आवश्यकता व्यक्त केली जात होती.

संरक्षण दलाचे प्रमुख अर्थात ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ हे पद नक्की काय आहे ?

* राष्ट्रपती हे संरक्षण दलाचे सर्वोच्च (सुप्रीम) कमांडर असतात. तर लष्कर, नौदल आणि वायुदलाचे स्वतंत्र प्रमुख असतात. संरक्षण दलाचा संयुक्त प्रमुख हा तिन्ही दलांचा संयुक्त प्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडेल. तिन्ही दलांशी संबंधित सरकारला सल्ला किंवा माहिती या अधिकाऱ्याकडून दिली जाईल.

संरक्षण दलप्रमुख या पदाची आवश्यकता का भासते?

* तिन्ही दलांमध्ये एकवाक्यता आवश्यक असते. लष्कर, नौदल आणि वायुदलाच्या अधिकाऱ्यांमध्ये अनेकदा मतभेद असतात. देशाच्या सुरक्षेच्या संदर्भात सरकारला सल्ला देण्याकरिता एकच सक्षम यंत्रणा असावी, असा विचार माजी लष्करी अधिकारी किंवा तज्ज्ञांकडून सातत्याने मांडण्यात येतो. संरक्षण दलाकरिता उपकरणांची खरेदी, प्रशिक्षण, लष्करी कारवाया यामध्ये समन्वय साधण्याकरिता तिन्ही दलांचा संयुक्त प्रमुख असावा अशी योजना सातत्याने मांडण्यात येत होती. या आधारेच मोदी यांनी हा निर्णय घेतला आहे.

अन्य कोणत्या देशांमध्ये संरक्षण दलाच्या प्रमुखांचे पद अस्तित्वात आहे?

* ब्रिटन, फ्रान्स, कॅनडा, श्रीलंकासह जगातील अनेक राष्ट्रांमध्ये हे पद अस्तित्वात आहे. काही राष्ट्रांमध्ये या पदाचे पदनाम वेगळे आहे. उदा. अमेरिकेत चीफ ऑफ स्टाफ ऑफ आर्मी असे संबोधले जाते. या पदावरील अधिकारी हा अमेरिकेच्या संरक्षण दलाचा सर्वात वरिष्ठ अधिकारी असतो. याशिवाय अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचा लष्करी सल्लागारही असतो. चीनमध्ये चीफ ऑफ जॉइंट स्टाफ असे पाच दलांच्या प्रमुखांचे पद आहे.

संरक्षण दलाच्या प्रमुख पदाच्या निर्मितीची आवश्यकता कधी व्यक्त करण्यात आली होती?

* १९९९ मध्ये कारगिल युद्धानंतर सुरक्षेच्या संदर्भातील त्रुटी दूर करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीने संरक्षण दलासाठी संयुक्त प्रमुख असावा, अशी शिफारस केली होती. तत्कालीन अटलबिहारी वाजपेयी सरकारने या दृष्टीने पुढाकारही घेतला होता. पण संरक्षण दलासाठी प्रमुख नेमण्यावर राजकीय मतैक्य झाले नाहीच पण लष्कर, नौदल आणि वायुदलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अंतर्गत विरोध झाला होता. कारण लष्करी अधिकारी या पदावर नेमला गेल्यास नौदल किंवा वायुदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना या अधिकाऱ्याच्या आदेशाने काम करावे लागणार आहे. संरक्षण दल प्रमुख पदाबाबत मतैक्य होत नसल्याने यावर मार्ग म्हणून तिन्ही दलाच्या प्रमुखांचा समावेश असलेल्या समितीची स्थापना करण्यात आली. तिन्ही दलांच्या प्रमुखांपैकी जो ज्येष्ठ असेल त्याकडे या समितीचे अध्यक्षपद असते. सध्या हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल बी एस धनोआ या समितीचे अध्यक्ष आहेत. हवाई दल प्रमुख हे ३० सप्टेंबरला निवृत्त होत असून त्यानंतर सर्वात ज्येष्ठ लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत हे अध्यक्ष होतील. रावत हे डिसेंबरअखेर निवृत्त होत आहेत. मनोहर पर्रिकर हे संरक्षणमंत्री असताना त्यांनी संरक्षण दल प्रमुखपदासाठी पुढाकार घेतला होता. पण नंतर तेच गोव्यात परतले आणि प्रस्ताव रखडला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 16, 2019 3:31 am

Web Title: chief of defense staff proposal since the kargil war zws 70
Next Stories
1 न्यायपालिकेत ‘अनुचित’ कृत्यांमध्ये अभूतपूर्व वाढ
2 हाँगकाँगमध्ये स्थिती चिघळल्यास तातडीने उपाय
3 ५ जवानांना ठार केल्याचा पाकचा दावा खोटा
Just Now!
X