चिकनगुनियाने जगात कोणाचाही मृत्यू होत नसल्याचा दावा दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी केला आहे. माझे म्हणणे पटत नसेल तर गुगलचा जाऊन शोधा असे सांगत त्यांनी आपले गुगल ज्ञान पाजळले आहे. सत्येंद्र जैन यांच्या विधानावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.  दिल्लीकरांना आरोग्याची समस्या भेडसावत असताना ‘आप’चे मंत्री पंजाब आणि गोवा विधानसभा निवडणुकांची मोर्चेबांधणी करण्यात दंग आहेत. यापार्श्वभूमीवर आपच्या नेत्यांवर टीका होत असताना दिल्लीच्या आरोग्य मंत्र्यांच्या चिकनगुनियावर विधान करुन भलताच वाद ओढावून घेतला.  दिल्लीमध्ये काही दिवसांपूर्वी चार नागरिकांचा चिकनगुनियाने मृत्यू झाला होता. या घटनेवेळी आरोग्यमंत्री शहराबाहेर असल्यामुळे त्यांच्यावर टीका झाली होती. दिल्लीला डासांपासून वाचवण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. परंतु अशा परिस्थिती आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन दिल्लीच्या बाहेर असल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. असे ट्विट एका दिल्लीकराने केले होते. यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांकडे कोणतेही अधिकार नाहीत. मी माझ्या मर्जीने एक पेनही खरेदी करू शकत नसल्याचे सांगत दिल्लीबाबत निर्माण झालेली ही समस्येबाबत  नायब राज्यपाल आणि पंतप्रधानांना प्रश्न विचारा असे उत्तर दिले होते.

दरम्यान, सत्येंद्र जैन यांनी गुगलचा दाखला दिल्यानंतर चिकनगुनियापासून कोणताही धोका नसल्याने नागरिकांनी घाबरु नये, असे म्हटले. तसेच या आजाराची लक्षणे दिसल्यास तात्काळ रुग्णालयात भेट देण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. दिल्लीकरांच्या मनातील या आजारासंबंधी निर्माण झालेली भीती घालविण्यासाठी मृत झालेल्या व्यक्ती या वयोवृद्ध असल्याची तसेच त्यांना इतर आजारही होते ही माहिती देखील जैन यांनी  यावेळी स्पष्ट केले.