करोना प्रतिबंधित क्षेत्रात राहत असल्याने रुग्णालयाकडून नकार

कोची : केरळमध्ये तीन वर्षांच्या मुलाने नाणे गिळल्यानंतर त्याला सरकारी रुग्णालयात दाखल करून घेण्यास नकार देण्यात आल्याने त्याचा मृत्यू झाला. हा मुलगा कोविड १९ प्रतिबंधात्मक क्षेत्रात राहत असल्याने त्याला प्रवेश नाकारण्यात आला.

आरोग्य मंत्री के.के. शैलजा यांनी ही घटना दुर्दैवी असल्याचे सांगून आरोग्य सचिवांना अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. जर या घटनेत काही गैरप्रकार दिसून आले तर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

मुलाच्या नातेवाईकांनी   आरोप केला की, ते कोविड १९ प्रतिबंधात्मक क्षेत्रात रहात असल्याने सरकारी रुग्णालयात प्रवेश देण्यात आला नाही. शनिवारी सकाळी हा प्रकार झाला असून त्यानंतर आईवडिलांनी त्या मुलाला अलुवा येथील सरकारी रुग्णालयात नेले. तेथे क्ष किरण छायाचित्र काढण्यात आले त्यात काही तरी वस्तू अडकल्याचे दिसले. त्यानंतर रुग्णालयाने या मुलाला दाखल करून घेतले नाही.

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयात कुणीही बालरोगतज्ज्ञ नसल्याने मुलाला दाखल केले नाही. त्याला एर्नाकुलम सरकारी रुग्णालयात नेण्याचा सल्ला देण्यात आला. त्या मुलाला तेथे नेल्यानंतर डॉक्टरांनी अलापुझा येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला, तेथेही या मुलाला दाखल करून घेण्यात आले नाही.

नंतर काही डॉक्टरांनी त्यांना मुलाला फळे खाऊ घाला म्हणजे ती वस्तू विष्ठेवाटे पडेल असा सल्ला दिला. आईवडील गरीब होते. त्यांनी मुलाला परत कडुंगलूर या त्यांच्या गावी नेले. नंतर त्याची प्रकृती ढासळत गेली. त्याला पुन्हा अलुवा रुग्णालयात नेत असताना त्याचा मृत्यू झाला. त्याचा नमुना कोविड चाचणीसाठी घेण्यात आला आहे.