शाळेतील शिक्षकाने कानशिलात लगावल्याने विद्यार्थ्याची दृष्टी गेल्याचा धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये घडला आहे. मेरठ रोडवर असलेल्या शारदन पब्लिक स्कूलमध्ये ही घटना घडली. पाचवीत शिकणारा हा मुलगा शाळेत त्याची वही घेण्यासाठी मित्राकडे गेला होता. तेव्हा त्याच्या मागे जाऊन शिक्षकाने या मुलाला जोरदार कानशिलात लगावली. त्यामुळे या मुलाच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यामुळेच त्याची दृष्टी गेली, असा आरोप या मुलाच्या पालकांनी केला. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

आम्ही यासंदर्भात शाळेच्या व्यवस्थापनाकडे तक्रार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, शाळा व्यवस्थापनाने आमचे काहीही ऐकून घेतले नाही, उलट आम्हालाच शिवीगाळ केली, असाही आरोप या मुलाच्या पालकांनी केला आहे. या मुलाला कानशिलात लगावल्यानंतर तो जेव्हा घरी आला तेव्हा त्याची अवस्था पाहून त्याच्या कुटुंबीयांना धक्काच बसला. शाळा प्रशासनही दाद देत नाही म्हटल्यावर या पालकांनी पोलिसात तक्रार नोंदवली. या प्रकरणाचा तपास सुरु करण्यात आला आहे. तसेच आम्ही तुमच्यावर कोणताही अन्याय होऊ देणार नाही असे आश्वासनही पोलिसांनी या मुलाच्या पालकांना दिले आहे. तसेच कानशिलात लगावणाऱ्या शिक्षकावर कठोर कारवाई करण्याचीही मागणी मुलाच्या पालकांनी केली आहे.