कोणत्याही व्यवसायात १४ वर्षांखालील मुलास कामाला ठेवल्यास मालकाला दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठाविण्याची तरतूद असलेले विधेयक मंगळवारी संसदेत मंजूर करण्यात आले. मात्र १४ वर्षांखालील जे मूल कुटुंबीयांना मदत करते त्याला यामधून वगळण्यात आले आहे. बालकामगार (प्रतिबंध आणि नियमन) सुधारणा विधेयकात १४ वर्षांखालील मुलास कामावर ठेवणे हा मालकांसाठी दखलपात्र गुन्हा ठरविण्यात आला आहे. १४ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांची व्याख्या किशोरवयीन वर्गवारीतील, अशी करण्यात आली आहे, त्यांना धोकादायक व्यवसायात कामाला ठेवता येणार नाही, असे नमूद करण्यात आले आहे.

 

बेपत्ता विमानाचे अवशेष सापडले?

रामेश्वरम : भारतीय हवाई दलाच्या बेपत्ता झालेल्या एएन-३२ या विमानाचा शोध सहाव्या दिवशीही सुरू असून बंगालच्या उपसागरात काही अवशेष मिळाले आहेत. हे अवशेष त्याच विमानाचे आहेत का, याची खातरजमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत वृत्त हाती आलेले नाही.

मात्र काही अवशेष मिळाले आहेत, त्याबाबत खातरजमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी येथे वार्ताहरांना सांगितले.

बंगालच्या उपसागरात मिळालेले अवशेष हवाई दलाच्या एएन-३२ याच विमानाचे आहेत का, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही, हवाई दल, नौदल आणि तटरक्षक दल सर्व प्रकारचे प्रयत्न करीत आहेत. तंबाराम हवाई तळावरून उड्डाण केल्यानंतर २२ जुलैला हे विमान अवघ्या १६ मिनिटांत रडारवरून गायब झाले होते. या विमानात संरक्षण दलाचे २९ कर्मचारी होते.