देशातील बालकामगारांसंदर्भातील कायदे बळकट न केल्यास मोदींची ‘मेक इन इंडिया’ ही योजना बालमजुरांसाठी घातक ठरू शकते, अशी भीती नोबेल पारितोषिक विजेते कैलाश सत्यार्थी यांनी व्यक्त केली आहे. सत्यार्थी यांनी पंतप्रधानांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, आंतरराष्ट्रीय मापदंडांचा विचार करता भारतातील बालकामगारांसबंधीचे कायदे खूपच तकलादू आहेत. परदेशातून येणारे गुंतवणूकदार याचा फायदा घेऊन बालकामगारांचा गैरवापर करून घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे ‘मेक इन इंडिया’ हे अभियान बालकामगारांसाठी घातकच ठरेल, असे सत्यार्थी यांनी पत्रात म्हटले आहे. ‘मेक इन इंडिया’ खरोखरच चांगले पाऊल आहे. मात्र, त्यामुळे देशातील अनेक गंभीर त्रुटी उघड होण्याची शक्यता आहे. बालकामगारांचे शोषण करून त्यांच्या बळावर ‘मेक इन इंडिया’ यशस्वी होऊ शकणार नाही, असेदेखील सत्यार्थी यांनी पत्रात म्हटले आहे.
याशिवाय सत्यार्थी यांनी बाल कामगार प्रतिबंध व नियमन कायद्यातील प्रस्तावित सुधारणांविषयीही चिंता व्यक्त केली. यामध्ये बालकामगारांसाठी प्रतिबंधित असलेल्या व्यवसायांची संख्या ८३ वरून तीन इतकी करण्यात आली आहे. ही सुधारणा मंजूर झाल्यास लहान मुलांना कौटुंबिक व्यवसायांमध्ये काम करण्याची मुभा मिळणार आहे.