इस्लामाबाद : पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्षाचे हिंदू खासदार डॉ. रमेश कुमार वंकवाणी यांनी जबरदस्तीने धर्मांतर आणि बालविवाहाबाबतची दोन विधेयके मंगळवारी संसदेत मांडली.

पाकिस्तानातील दोन हिंदू मुलींचे अपहरण आणि त्यांच्या जबरदस्तीने धर्मातराच्या पाश्र्वभूमीवर त्यांनी ही विधेयके मांडली आहेत. होळीच्या दिवशी सिंध प्रांतातील काही प्रभावशाली व्यक्तींनी रविना (१३) आणि रीना (१५) या दोन हिंदू मुलींचे अपहरण केले. त्यानंतर त्यांचे धर्मातर करून त्यांचा जबरदस्तीने विवाहही करण्यात आला आणि या सर्व प्रकाराचा व्हिडीओ त्यानंतर व्हायरल करण्यात आला होता. त्यानंतर देशभर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या.

पाकिस्तानी तेहरिक-ए-इन्सान या पक्षाचे खासदार असणाऱ्या वंकवाणी यांनी बालविवाह नियंत्रण कायदा सुधारणा विधेयक आणि फौजदारी कायदा (अल्पसंख्यांक संरक्षण) २०१९ संसदेत सादर केला.

वंकवाणी यांच्याव्यतिरिक्त पाकिस्तानातील सर्वच पक्षाच्या अल्पसंख्याक खासदारांनी या विघेयकावर सह्य़ा करून पाठिंबा दिला आहे. २०१६ मध्ये सिंध प्रांताच्या मंत्रिमंडळात हे विधेयक मांडण्यात आले होते, मात्र कट्टरवाद्यांच्या विरोधामुळे ते मान्य झाले नव्हते. पाकिस्तानातील सिंध प्रातांत सर्वाधिक अल्पसंख्याक हिंदूंचे वास्तव्य आहे. या २ विधेयकामध्ये कोणत्याही अल्पवयीन मुलगी किंवा मुलाला जबरदस्तीने धर्मातर करायला लावणाऱ्यास कमीत कमी पाच वर्षांची आणि जास्तीत जास्त जन्मठेपेची शिक्षा देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.

पाकिस्तानात अल्पसंख्याकाच्या नव्हे तर एकंदरच सर्वत्र बालविवाहाची समस्या दिसून येते असे वंकवाणी यांनी सांगितले.