दिल्लीच्या पूर्व भागात एका पाच वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून येथील न्यायालयाने दोन आरोपींना २३ मेपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
सदर आरोपींची नावे मनोज साह (२२) आणि प्रदीप (१९) अशी असून त्यांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत शुक्रवारी संपुष्टात येत होती. त्यामुळे त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता अतिरिक्त सत्र न्यायमूर्ती संजय गर्ग यांनी २३ मेपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
दिल्लीच्या पूर्व भागातील गांधीनगर येथे एकाच इमारतीमध्ये सदर अल्पवयीन मुलगी आणि आरोपी राहत होते आणि १५ एप्रिल रोजी या दोघांनी तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर जवळपास ४० तासांनी त्या मुलीची सुटका करण्यात आली आणि सध्या तिच्यावर अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत उपचार सुरू आहेत.
दिल्ली पोलिसांनी प्रथम मुख्य आरोपी मनोज याला प्रदीप याच्यासमोर आणले आणि त्यानंतर प्रत्यक्ष गुन्हा कसा घडला याची माहिती जाणून घेतली. त्यानंतर मनोजला बिहारमधील मुझफ्फरनगर येथे नेण्यात आले आणि त्याचे रक्ताने माखलेले कपडे ताब्यात घेतले.
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्यानंतर तिला ठार मारण्याचा प्रयत्नही करण्यात आला. सदर मुलगी मरण पावली असे वाटल्याने त्या दोघांनी तेथून पळ काढला आणि ते बिहारकडे रवाना झाले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 10, 2013 5:33 am