मुलांमधील स्मार्ट फोनची व्यसनाधीनता कमी करण्यासाठी जपानमधील टोकियो शहरात रात्री नऊनंतर शाळकरी मुलांवर मोबाइल वापरण्यावर बंदी घातली आहे.
ही बंदी कायदेशीर नसली तरी प्रत्येक कुटुंबाने त्याची अंमलबजावणी करावी अशी सरकारची अपेक्षा आहे. ही बंदी एप्रिलपासून लागू होत असून कारिया, आएची परफेक्चर येथील किमान १३ हजार मुलांना त्यांचे सेलफोन रात्री नऊ वाजता आईवडिलांच्या ताब्यात द्यावे लागणार आहेत.  
कॅरीगन ज्युनियर हायस्कूलच्या प्राचार्या फुशीतोशी ओहासी यांनी ‘द जपान टाइम्स’ला सांगितले की, मुलांना सेलफोनपासून परावृत्त करण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे. त्यांच्या मते काही पालक म्हणाले की, सरकारने असा नियम केला हे चांगले झाले. त्याच्या नावाखाली आम्ही मुलांकडून मोबाइल काढून घेऊ, अन्यथा ते रात्री उशिरापर्यंत गेम खेळतात. जे विद्यार्थी नियमाचे पालन करणार नाहीत त्यांना शिक्षा केली जाणार नाही.
१३ हजार मुलांची पाहणी
कारिया येथे १३ हजार शाळकरी मुले असून नोव्हेंबरमध्ये शाळांमध्ये पाहणी करण्यात आली असता कनिष्ठ माध्यमिक शाळांमधील ५८.२ टक्के मुले सेलफोन वापरतात असे दिसून आले. ही बाब त्यांच्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्यास हानिकारक ठरू शकते.