मागे पडलेल्या १४ देशांमध्ये समावेश; ‘लॅन्सेट’च्या शोधनिबंधातील निष्कर्ष

भक्ती बिसुरे, लोकसत्ता
नवजात बालकांना आयुष्यभर अनेक घातक आजारांपासून संरक्षण मिळावे यासाठी त्यांचे लसीकरण केले जाते. शून्य ते पाच वर्षे वयोगटातील हे लसीकरण त्यांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे असते. मात्र, १४ देशांमध्ये अनेक नवजात बालके  घटसर्प-धनुर्वात-डांग्या खोकला या प्राथमिक ‘डीपीटी’ लसीकरणापासून वंचित असून, त्यात भारताचाही समावेश आहे. ‘लॅन्सेट’ या जगविख्यात वैद्यकीय नियतकालिकाच्या शोधनिबंधातून हे वास्तव अधोरेखित झाले आहे.

‘लॅन्सेट’ने १९८४ ते २०१९ या काळातील २०४ देशांतील बालकांच्या नियमित लसीकरणाचा अभ्यास केला. घटसर्प, धनुर्वात आणि डांग्या खोकला (डीटीपी) या रोगांच्या लशींपासून कायमस्वरूपी वंचित राहिलेल्या बालकांचा समावेश ‘शून्य लसीकरण’ यादीतील बालकांमध्ये करण्यात आला आहे. या व्याख्येनुसार जागतिक स्तरावर १९८९ मध्ये पाच कोटी ६८ लाख बालके  शून्य लसीकरण यादीत समाविष्ट झाली. २०१९ पर्यंत या संख्येत सुमारे ७५ टक्के  घट झाली आहे, मात्र आजही एक कोटी ४५ लाख बालके  लसीकरणापासून वंचित राहत आहेत. अंगोला, ब्राझील, चाड, चीन, कांगो प्रजासत्ताक, इथिओपिया, इंडोनेशिया, मेक्सिको, नायजेरिया, पाकिस्तान, फिलिपिन्स, सोमालिया आणि दक्षिण आफ्रिका या देशांसह भारताचाही या यादीत समावेश आहे. १९८४ ते २०१९ या काळात बालकांच्या लसीकरणाचे चित्र सकारात्मकरीत्या बदलले आहे, मात्र आजही अनेक कारणांनी बालके  त्यांच्या नियमित लसीकरणापासून वंचित राहत आहेत, असे ‘लॅन्सेट’च्या अहवालात म्हटले आहे.

वर्षांनुवर्षांच्या लसीकरणामुळे घटसर्प-धनुर्वात-डांग्या खोकला या आजारांचे प्रमाण कमी झाले आहे. बूस्टर लस न मिळाल्यास घटसर्प होतो. डांग्या खोकल्याचे निदान करणे अवघड आहे. मातांच्या लसीकरणामुळे धनुर्वाताचे प्रमाण लक्षणीय घटले आहे. याचा अर्थ या लशींची गरज नाही असा होत नाही, असे भारतीय बालरोगतज्ज्ञ संघटनेचे माजी अध्यक्ष डॉ. प्रमोद जोग यांनी स्पष्ट केले.

निरक्षरता, अंधश्रद्धा, अपसमज आणि दुर्गम भाग यामुळे देशात ‘बिमारू राज्ये’ अशी ओळख असलेल्या बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये बालकांचे लसीकरण कमी आहे. म्हणून या यादीत भारताचे नाव दिसल्यास आश्चर्य वाटू नये.

– डॉ. प्रमोद जोग, माजी अध्यक्ष, भारतीय बालरोगतज्ज्ञ संघटना

करोनाकाळात २.३० कोटी बालके  वंचित

करोना साथीमुळे बालकांच्या लसीकरणात खंड पडला आहे. जागतिक स्तरावर दोन कोटी ३० लाख बालकांचे नियमित लसीकरण होऊ शकलेले नाही, असे संयुक्त राष्ट्रांनी स्पष्ट के ले आहे. करोना प्रतिबंधात्मक लस हा सध्या संपूर्ण जगाच्या प्राधान्यक्रमाचा विषय आहे, मात्र अशा काळात बालकांचे लसीकरण रखडणे ही गंभीर बाब असल्याचे जागतिक आरोग्य संघटना आणि युनिसेफने म्हटले आहे.