लष्कर व पोलीस यांनी मुले पळवण्याच्या अफवेमुळे जमावाकडून मारले जाण्यापासून तीन साधूंना वाचवले आहे. आसाममधील दिमा हसाव जिल्ह्य़ात ही घटना घडली असून त्यात जमावाला हे साधू मुले पळवणारे आहेत असे वाटले व तशा अफवा पसरल्या होत्या.

जिल्हा प्रशासन अधिकाऱ्यांनी सांगितले की, मुले चोरण्यासाठी हे साधू आले आहेत अशी अफवा पसरली होती. त्यामुळे हजारो लोक त्यांच्या तात्पुरत्या निवाऱ्याभोवती जमले व त्यांनी या साधूंचे सामान फेकून दिले. त्याचे चित्रण करून ते समाजमाध्यमांवर टाकले त्यामुळे अफवा आणखी पसरत गेली. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने उपायुक्त अमिताभ राजखोवा  व पोलीस अधीक्षक प्रशांत सैकिया यांच्या नेतृत्वाखाली आपत्कालीन बैठक घेऊन त्यासाठी समाजातील गटांच्या प्रमुखांना पाचारण केले. त्यांना जबाबदारीने वागण्याचा इशारा दिला.

समाजमाध्यमातील अफवांना  बळी पडू नका असे बैठकीत सांगण्यात आले. नंतर या गटांच्या प्रमुखांनी लोकांना कुणी संशयित असल्यास पोलिसांना कळवा, त्यांना मारू नका असे जाहीर केले. ८ जून रोजी दोन मित्र कारबी अंगलाँग येथे गेले असता त्यांना ग्रामस्थांनी मुले चोरणारे असल्याच्या संशयावरून ठेचून मारले होते.

अफवांविरोधी प्रचारकास ठार मारणाऱ्या म्होरक्यास अटक

त्रिपुरात मुले पळवण्याच्या अफवांविरोधात जनजागृतीसाठी सरकारच्या माहिती  खात्याने नेमलेल्या पथकातील एकास ठेचून ठार मारण्यात आल्याच्या प्रकरणात सुनील मोहन या प्रमुख आरोपीसह नऊ जणांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुनील मोहन याला दक्षिण त्रिपुरा जिल्ह्य़ातील साब्रुम येथे अटक करण्यात आली, दुसऱ्या एका आरोपीला विद्यार्थी वसतिगृहातून अटक करण्यात आली असून त्याचे नाव हिरेन त्रिपुरा असे आहे, असे पोलीस महानिरीक्षक के.व्ही. श्रीजेश यांनी सांगितले. सुकांता चक्रवर्ती याला जमावाने ठार मारल्याची चित्रफीत आम्हाला मिळाली होती त्याच्या आधारे आम्ही तपास केला. हे सर्व जण मारहाणीत सामील होते असे चित्रफितीतून स्पष्ट झाले आहे. या प्रकरणातील सात जणांना या आधी अटक करण्यात आली असून सहायक पोलीस उपनिरीक्षक व त्रिपुरा राज्य रायफल्सच्या दोन जवानांना या प्रकरणी निलंबित करण्यात आले आहे. मारला गेलेला सुकांता चक्रबर्ती हा दक्षिण त्रिपुरा जिल्ह्य़ातील होता व त्याला २८ जून रोजी अफवांविरोधात जनजागृती करण्यासाठी गेला असता कलचेरा खेडय़ातून परतत असताना ठेचून ठार मारण्यात आले होते. त्याला जनजागृतीच्या कामासाठी सरकारच्या सांस्कृतिक व  माहिती खात्याने नेमले होते.