जास्तीत जास्त चाचण्या आणि जलदगतीने त्या चाचणीचा रिपोर्ट हाच सध्याच्या घडीला करोना व्हायरसच्या फैलावावर नियंत्रण मिळवण्याचा एकमेव मार्ग आहे. एखाद्याला करोनाची लागण झाली असल्यास, त्याचे निदान लवकरात लवकर व्हावे, यासाठी जगात वेगवेगळया टेक्निक विकसित केल्या जात आहेत. श्वानांना प्रशिक्षण देणे हा सुद्धा त्याच टेक्निकचा एक भाग आहे.

सुरुवातीच्या स्टेजला असतानाच माणसाच्या शरीरातील घामामधून करोनाचे निदान करण्यासाठी चिलीमध्ये श्वानांना प्रशिक्षण दिले जात आहे. यूकेमध्ये अशाच प्रयोगाचे उत्साहवर्धक निष्कर्ष समोर आले आहेत. चिलीमध्ये लॅब्राडोर आणि गोल्डन रिट्राईव्हर्स प्रकारातील चार श्वानांना प्राथमिक प्रशिक्षणासाठी निवडण्यात आले आहे. राजधानी सँटिगो येथील कॅराबिनीरो स्पेशलिस्ट ट्रेनिंग बेस येथे त्यांचे प्रशिक्षण सुरु आहे. रॉयटर्सने हे वृत्त दिले आहे.

लॅब्राडोर आणि गोल्डन रिट्राईव्हर्स प्रकारातील श्वान ड्रग्स, स्फोटके आणि माणसांना शोधून काढण्यासाठी ओळखले जातात. त्याशिवाय यापूर्वी मलेरिया, कॅन्सर आणि पार्किसन्सचे रुग्ण शोधून काढण्यासाठीही श्वानांना प्रशिक्षित करण्यात आले होते.

श्वानामध्ये ३० लाखापेक्षा जास्त घाणेंद्रिये आहेत. माणसापेक्षा हे प्रमाण ५० पट जास्त आहे. त्यामुळे करोना व्हायरस विरुद्ध लढयात श्वानाची मदत होऊ शकते असे पोलीस स्पेशलिटी ट्रेनिंग स्कूलचे संचालक लेफ्टनंट कर्नल क्रिस्टियन यानेझ म्हणाले. चिलीमध्ये शाळा, दुकाने सुरु होतील आणि नागरिक कामावर जायला सुरुवात करतील, तेव्हा हे श्वान महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.

“शाळा, बस डेपो आणि विमानतळ आणि अन्य वर्दळीच्या ठिकाणी श्नांना ठेवण्याची योजना आहे. आपल्या हुंगण्याच्या क्षमतेने श्वान सुरुवातीच्या स्टेजमध्ये असतानाच करोना रुग्णाला शोधून काढतील. त्यानंतर आम्ही त्याला आयसोलेट करु. त्याची पीसीआर टेस्ट होईल जेणेकरुन या आजाराचा सर्वदूर होणारा फैलाव रोखता येईल”. असे यानेझ म्हणाले.