चीनचा गलवान खोऱ्यावरील दावा भारताने फेटाळून लावला आहे. तरीही चीनकडून सातत्याने गलवान खोरे आमचेच असल्याचा दावा केला जात आहे. यासंबंधी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियन यांनी आज सकाळी एकापाठोपाठ एक आठ टि्वट केले. या टि्वटमध्ये त्यांनी गलवान खोऱ्याचा भाग चीनचा कसा आहे? हे सांगताना सोमवारी तिथे घडलेल्या रक्तरंजित संघर्षासाठी भारताला जबाबदार धरले आहे.

उलट भारतानेच चीनच्या हद्दीत घुसखोरी केली असा त्यांचा आरोप आहे. गलवान खोऱ्यामध्ये भारताकडून सुरु असलेली इन्फ्रास्ट्रक्चरची उभारणी हे चीनचे मूळ दुखणे असल्याचेही त्यांच्या सर्व टि्वटमधून स्पष्ट झाले आहे.

झाओ लिजियन यांनी काय म्हटले आहे

पश्चिम क्षेत्रामध्ये नियंत्रण रेषेजवळ चीनच्या हद्दीमध्ये गलवान खोरे आहे, असा झाओ लिजियन यांनी दावा केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून चिनी सैनिकांच्या तुकडया इथे तैनात असून ते या भागामध्ये पेट्रोलिंग करतात.

एप्रिल महिन्यापासून गलवान खोऱ्यात नियंत्रण रेषेजवळ भारतीय सैन्य तुकडया रस्ते, पूल आणि अन्य सुविधांची उभारणी करत आहेत. आम्ही याचा निषेध नोंदवला. पण भारताने त्यापुढे जात नियंत्रण रेषा ओलांडली व चिथावणी दिली असा आरोप झाओ लिजियन यांनी त्यांच्या टि्वटमधून केला आहे.

सहा मे रोजी भारतीय सैन्य तुकडयांनी नियंत्रण रेषा ओलांडून तटबंदी तसेच बॅरिकेडसची उभारणी केली. त्यामुळे चीनच्या सैनिकांना पेट्रोलिंगमध्ये अडथळे आले. भारताने एकतर्फी जैसे थे परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करुन जाणीवपूर्वक चिथावणी दिली असा उलटा आरोप चीनने केला आहे.

भारताची काय भूमिका
चीनचा गलवान खोऱ्यावरील दावा भारताने फेटाळून लावला आहे. चीनचे दावे अतिशयोक्तीपूर्ण आणि असमर्थनीय असून, ते ६ जूनला उच्चस्तरीय लष्करी बैठकीत झालेल्या निर्णयाशी विसंगत आहेत, असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी सांगितले.

‘‘सीमा व्यवस्थापनाबाबत भारताने नेहमीच जबाबदारीने भूमिका पार पाडली आहे. भारताने नेहमीच पायाभूत सुविधा उभारणीसह इतर हालचाली प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या अलीकडच्या भूभागापर्यंतच सीमित ठेवल्या असून, चीननेही स्वत:च्या सैन्याच्या हालचाली सीमित ठेवाव्यात, असे श्रीवास्तव यांनी सांगितले.