सीमेवरील तणावावरून चीनने पुन्हा कांगावा केला आहे. सीमेवर शांतता राखण्याबाबतच्या करारांचा भारतानेच भंग केल्याचा आरोप चीनने बुधवारी केला.

चीनने पूर्व लडाखमध्ये लष्करी जमवाजमव केली असून, त्यांच्या सैन्याने करारांचे उल्लंघन केल्याचे नमूद करतानाच संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सार्वभौमत्व आणि भौगोलिक एकात्मता अबाधित राखण्यास भारत समर्थ असल्याचे मंगळवारी लोकसभेत ठणकावून सांगितले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने भारतावरच दोषारोप केला.

‘‘भारत आणि चीन यांच्यातील करारांचे आम्ही पालन करतो. सीमेवर शांतता आणि सौहार्द राखण्यास चीन कटिबद्ध आहे. मात्र, सीमेवरील सध्याच्या परिस्थितीला चीन नव्हे, भारत जबाबदार आहे,’’ असा आरोप चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन यांनी बुधवारी केला. भारताकडून प्रथम गोळीबार करण्यात आला असून, त्यांनीच करारांचा भंग केला, असा दावा त्यांनी केला. भारताने आपल्या चुका सुधाराव्यात आणि सीमेवरील तणाव दूर करण्यासाठी ठोस पावले उचलावीत, असा अनाहूत सल्लाही त्यांनी दिला.

चीनने याआधी केलेले असे आरोप भारताने फेटाळले होते. पूर्व लडाखमध्ये चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने अनेकदा गोळीबार करत भारतीय जवानांना चिथावणी देण्याचा प्रयत्न केला असून, चीनने प्रत्यक्ष ताबारेषेचा सन्मान केला पाहिजे, असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी स्पष्ट केले होते.

सरकारकडून गलवान शहिदांचा अवमान : काँग्रेस</strong>

गेल्या सहा महिन्यांत भारत-चीन सीमेवर घुसखोरी झालेली नसल्याचे सरकारने दिलेले उत्तर धक्कादायक आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे.

१५ जूनला गलवान खोऱ्यात झालेला संघर्ष चिनी भूभागावर झाला होता का, असा सवाल काँग्रेसने केला. सरकारने गलवानमधील शहीद जवानांचा अवमान केला असून, चीनला निर्दोषत्व बहाल केले, असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी केला. मोदी सरकार भारतीय सैन्याबरोबर आहे की चीनबरोबर, असा सवाल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्वीटद्वारे केला.

सहा महिन्यांत चीन सीमेवर घुसखोरी नाही : केंद्र

गेल्या सहा महिन्यांत भारत-चीन सीमेवर घुसखोरी झालेली नाही, अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी बुधवारी राज्यसभेत लेखी उत्तरात दिली. गेल्या सहा महिन्यांत भारत-पाकिस्तान सीमेवर मात्र ४७ वेळा घुसखोरीचा प्रयत्न झाल्याची माहिती सरकारने दुसऱ्या एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली. गेल्या तीन वर्षांत पाकिस्तानी दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये ५९४ घुसखोरीचे प्रयत्न केले. त्यापैकी ३१२ वेळा घुसखोरी झाली. याच कालावधीत जम्मू-काश्मीरमध्ये ५८२ दहशतवादी ठार झाले. ४६ दहशतवाद्यांना अटक करण्यात आली, असे सरकारने म्हटले आहे.