पूर्व लडाखमध्ये गलवान येथे गेल्या वर्षी जूनमध्ये झालेल्या हिंसक संघर्षांत आपले पाच अधिकारी मारले गेल्याची कबुली चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ने प्रथमच शुक्रवारी दिली.

भारत आणि चीनच्या लष्करी संघर्षांत चाळीसहून अधिक चिनी सैनिक मारले गेल्याचा दावा केला जात होता. मात्र केवळ पाच अधिकारी मारले गेल्याची कबुली चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) शुक्रवारी संघर्षांनंतर सहा महिन्यांनी दिली. सीमेवर काराकोरम पर्वतराजीत हे पाच आघाडीचे लष्करी अधिकारी तैनात होते, असे चिनी मध्यवर्ती लष्करी आयोगाने (सीएमसी) म्हटले आहे.

चीनने दोन अधिकारी आणि तीन सैनिकांचा सन्मान केला. त्यात मरणोत्तर सन्मान प्राप्त झालेल्या चार जणांचा समावेश आहे. चीनच्या पश्चिम सीमेचे संरक्षण करताना त्यांना मरण आल्याचे वृत्त चीनच्या ‘क्षिनुआ’ या सरकारी वृत्तसंस्थेने ‘पीएलए डेली’ या चिनी लष्करी वृत्तपत्राच्या हवाल्याने प्रसिद्ध केले आहे.

चीनच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्या हुआ चुनिंग यांनीही याबाबतची अधिकृत माहिती दिली. लोकांना सत्य सांगणे आवश्यक आहे. कारण लोक सत्याच्या प्रतीक्षेत होते. ते सांगण्यासाठीच आम्ही ते जाहीर करत आहोत, असे हुआ चुनिंग यांनी स्पष्ट केले. चिनी सरकारी माध्यमांनीही गलवान खोऱ्यातील संघर्षांची चित्रफीत ट्वीट केली आहे. तीत हिमनदीमध्ये दोन्ही देशांच्या सैनिकांतील धुमश्चक्री स्पष्ट दिसत आहे.

गलवान संघर्षांत चिनी सैनिकांनी भारतीय जवानांवर दगडांचा मारा केला होता. तसेच खिळे बसवलेल्या काठय़ांनी भारतीय जवानांवर हल्ला केला होता. चिनी सैनिकांना भारतीय जवानांनीही जोरदार प्रतिकार केला होता. त्यांत सीमेवरून घुसखोरी करणारे चार चिनी सैनिक आणि एक अधिकारी मारला गेल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

भारताने आपले २० जवान शहीद झाल्याचे लगेचच जाहीर केले होते, तर चीनने मात्र प्राणहानी झाल्याची बाब लपवली होती. ‘तास’ या रशियन वृत्तसंस्थेने चीनचे ४५ सैनिक ठार झाल्याचे, तर अमेरिकी गुप्तचरांनी ३५ सैनिक मारले गेल्याचे म्हटले होते. या पार्श्वभूमीवर चीनने प्रथमच आपले अधिकारी मारले गेल्याची कबुली दिली आहे.

चिनी वृत्तपत्रांनीही अधिकारी मारले गेल्याचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. जून २०२० मध्ये गलवान येथे ही चकमक झाली होती, असे वृत्त ‘पीएलए डेली’ या चिनी लष्कराच्या वृत्तपत्राने शुक्रवारी प्रसिद्ध केले आहे. जे मारले गेले त्यात रेजिमेंट कमांडर क्वी फाबाओ यांचा समावेश होता. पीपल्स लिबरेशन आर्मीच्या शिनजियांग लष्करी कमांडने ही माहिती दिल्याचे वृत्त चीनच्या ‘ग्लोबल टाइम्स’ने ‘पीएलए डेली’च्या हवाल्याने प्रसिद्ध केले आहे.

गलवान संघर्षांत मारल्या गेलेल्या की फाबो यांना चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी ‘हिरो रेजिमेंटल कमांडर’ सन्मान दिला, तर चेन होनग्विन याला सीमेचे रक्षण करणारा नायक, शेन शियाग्राँघ, शियाओ सियुआन आणि वँग झुओरान यांना आघाडीवरील सैनिक असे सन्मान जाहीर केले आहेत. पीपल्स लिबरेशन आर्मीचे तीन सैनिक नदी ओलांडताना चकमकीत मारले गेले. ते क्वि फाबोओ यांच्या मदतीला जात होते. फाबोओ यांच्या डोक्याला जखम झाली होती, असे चिनी वृत्तपत्रांनी म्हटले आहे.

पीपल्स लिबरेशन आर्मीचा हवाला देऊन चीनच्या ‘पीपल्स डेली’ने म्हटले आहे की, चीनचे पाच सैनिक परदेशी सैन्याशी लढताना मारले गेले. त्यांनी भारतीय लष्कर असा शब्द प्रयोग केलेला नाही यावरून सैन्य माघारीच्या प्रक्रियेत आणखी अडचणी येऊ नयेत असा चीनचा हेतू असल्याची शक्यता वर्तवली गेली आहे.

आज पुन्हा चर्चा : सैन्यमाघारीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आता दोन्ही देशांमध्ये आज, शनिवारी अन्य भागांतील माघारीबाबत वरिष्ठ लष्करी अधिकारी पातळीवरील चर्चेची पुढची फेरी होत आहे.  भारत आणि चीन या दोन्ही देशांनी पँगाँग सरोवराच्या उत्तर आणि दक्षिण सीमेवरून सैन्य आणि शस्त्रास्त्रांसह अन्य सामग्रीही माघारी घेतल्याची उपग्रह छायाचित्रेही प्रसिद्ध झाली आहेत.