गेल्या वर्षभरापासून अमेरिका आणि चीनमध्ये सुरू असलेल्या ट्रेड वॉरचा फायदा भारताला होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, चीनमधील अनेक अमेरिकन कंपन्यांना इतर देशांच्या तुलनेत भारतीय बाजारपेठ अनुकूल मानत असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, तैवानच्या फॉक्सकॉन या कंपनीने आपला व्यवसाय भारतात सुरू करण्याची योजना आखली आहे. तर दुसरीकडे अॅपल आणि अॅमेझॉन इकोचे उत्पादन चीनमधून भारतात स्थानांतरीत होत असल्याची माहितीही समोर येत आहे.

फॉक्सकॉनला हॉन हाय प्रिसिसन इंडस्ट्री कंपनीच्या नावाने ओळखले जाते. या कंपनीने चार वर्षांपूर्वी भारतात आपली कंपनी सुरू केली होती. सध्या या ठिकाणी कंपनीचे दोन असेंबली प्लांट सुरू आहेत. तसेच कंपनीने अन्य दोन प्लांट सुरू करण्याची योजनाही आखली आहे. गेल्या वर्षी ट्रेड वॉरदरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनमधील अनेक उत्पादनांवरील शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये आयफोन, अॅमेझॉन इको आदीचाही समावेश आहे.

दरम्यान, चीनच्या कंपन्यांकडून अमेरिकन कंपन्यांविरोधात अन्यायकारक स्पर्धा सुरू असल्याचा आरोप अमेरिकन कंपन्यांकडून करण्यात आला आहे. तसेच गुरूवारी अमेरिका-चीन व्यापार परिषदेचा वार्षिक अहवाल जाहीर करण्यात आला. यानुसार 81 टक्के कंपन्यांनी आपल्या नुकसान सोसावे लागले असल्याचे म्हटले आहे. गेल्या वर्षी हा आकडा 73 टक्के होता.